रांजणगाव देशमुख येथे निळवंडेच्या पाण्यासाठी रस्तारोको
By सचिन धर्मापुरीकर | Published: November 17, 2023 03:45 PM2023-11-17T15:45:40+5:302023-11-17T15:46:21+5:30
शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता.
कोपरगाव (जि. अहमदनगर) : निळवंडेच्या पाण्याने पाझर तलाव भरून द्यावे या मागणीसाठी कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे उपोषण सुरू आहे. उपोषणला पाठिंबा देण्यासाठी लाभधारक शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जो पर्यंत कोपरगाव तालुक्यातील पाझर तलावात पाणी सोडणे सुरू होत नाही तो पर्यंत, उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा ॲड. योगेश खालकर यांनी दिला. शुक्रवार उपोषणाचा दुसरा दिवस होता.
ॲड. योगेश खालकर, डॉ. अरूण गव्हाणे, गजानन मते, मनेगावचे सरपंच आण्णासाहेब गांगवे, कैलास रहाणे, संजय बर्डे आदी शेतकरी मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत उपोषणावर ठाम आहे. निळवंडेच्या दुसऱ्या चाचणीतून तळेगाव शाखेला पाणी सोडण्यात आले. एक टीएमएसी पाण्याची नासाडी करण्यात आली. जलसंपदा अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे कोपरगाव तालुक्यातील एकाही पाझर तलावात पाणी आले नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निळवंडेच्या चाचणीसाठी दीड टीएमएसी पाण्याची वाढीव उपलब्धता करून देण्यात आली आहे. मात्र अधिकाऱ्यांमुळे लाभक्षेत्र पाण्यापासून वंचित ठेवतील अशी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती करण्यासाठी जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता महेश गायकवाड, तहसिलदार संदिपकुमार भोसले, शिर्डीचे पोलिस निरिक्षक संदिप शिरसाठ उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासमवेत उपकार्यकारी अभियंता व तहसिलदार यांनी तालुक्यातील सर्व पाझर तलावात पाणी सोडण्याच्या जागाची पाहणी केली. या पाहणीनंतर जलसंपदा अधिकारी यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्यांनी सुचविलेले पर्याय उपोषणकर्त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
रास्ता रोको आंदोलनावेळी शिवाजी शेंडगे, बाळासाहेब गोर्डे, धिरज देशमुख, अँड योगेश खालकर, अनिता खालकर, धनंजय वर्पे, गजानन मते, कैलास रहाणे, सुखलाल गांगवे आदींची भाषणे झाली.
आत्मदहनाचा इशारा
उपोषणास पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. जनभावना तिव्र असतानाही प्रशासनाकडून योग्य ती कारवाई व ठोस आश्वासन न दिल्याने उपोषणकर्ते ॲड. योगेश खालकर यांनी शनिवारी (दि. १८) आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.