महावितरणविरोधात सिद्धटेकमध्ये रास्तारोको : पुणे,दौंड,श्रीगोंदा,कर्जतकडील वाहतूक दोन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 04:44 PM2018-05-18T16:44:20+5:302018-05-18T16:44:31+5:30
कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने तापलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको करून आपल्या संतापाला वाट करून दिली.
राशीन : कर्जत तालुक्यातील सिद्धटेकनजीकच्या वडार वस्ती येथील ग्रामस्थांनी विज महावितरणच्या कारभाराविरोधात दौंड-राशीन मार्गावर विजेच्या खांबावरील लोंबकळलेल्या धोकादायक वीजवाहक तारा व रोहित्राची तातडीने दुरूस्ती करण्याच्या मागणीसाठी महावितरणकडून सतत दुर्लक्ष होत असल्याने तापलेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको करून आपल्या संतापाला वाट करून दिली.
महावितरणच्या राशीन येथील प्रभारी सहायक अभियंत्यांनी वीजवाहक तारा व रोहित्र दुरूस्तीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलकांनी यापूर्वी राशीन येथील महावितरणच्या कार्यालयात याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने सकाळी ग्रामस्थांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. रास्तारोकोमुळे पुणे,दौंड,बारामती,श्रीगोंदा,कर्जतकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
वडार वस्तीवरील शेतीसाठी व घरगुती वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिनीच्या तारा धोकादायक पध्दतीने लोंबकळत आहेत. वादळी पावसामध्ये अनेक वेळा तारा तुटून पडण्याच्या घटना यापूर्वी घडल्या. तसेच प्राथमिक शाळेजवळून जाणाºया वीजवाहिनीही धोकादायक बनली आहे. यामुळे जीवित व वित्त हानी होऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी महावितरणकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार करून काहीच दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले. सिद्धटेक परिसरातील वीज वाहिनीच्या तारा कमजोर झाल्या आहेत. अनेक ठिकाणी विजेचे लोखंडी खांब कुजले आहेत. शेतामधील खांब ही अनेक ठिकाणी झुकलेले आहेत. त्यामुळे भविष्यात होणारा धोका टाळण्यासाठी धोकादायक खांब व वीजवाहिन्यांचे सर्वेक्षण करून त्यांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली.
या मागण्यांचे निवेदन महावितरणच्या उपअभियंत्यांनी स्वीकारून जळालेले विद्युत रोहित्र व वीजवाहिनीच्या तारा आठ दिवसांमध्ये बदलून दिल्या जातील, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आश्वासनाप्रमाणे महावितरणने उपाययोजना न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपस्थितांनी दिला.