सुपा एमआयडीसीतील रस्त्यांची होणार दुरुस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:20+5:302021-01-23T04:20:20+5:30
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत व येथील दुभाजकातील झाडांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ११ जानेवारीच्या ‘लोेकमत’मध्ये वृत्त ...
सुपा : पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत व येथील दुभाजकातील झाडांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ११ जानेवारीच्या ‘लोेकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच याची दखल घेत आद्योगिक महामंडळाने (एमआयडीसी) या कामासाठी निविदा मागविल्या आहेत.
सुपा एमआयडीसीचे तीन टप्पे पडले असून, पहिल्या टप्यात सुपा, हंगा व वाघुंडे खुर्द गावच्या शिवारात कारखानदारी आलेली आहे. येथे सुरुवातीच्या काळातच रस्ते झाले आहेत. त्यांची तात्पुरती मलमपट्टी होते. त्यामुळे या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथील कारखानदार, कामगार, वाहनचालकांना होणारा त्रास लक्षात आल्यानंतर याबाबत ११ जानेवारीला ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापत्य विभागातील उपविभागाच्या अभियंत्यांनी रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीबाबत वरिष्ठांशी चर्चा केली. रस्त्याची दुरुस्ती व झाडांची देखभालीसाठीचा प्रस्ताव पाठविला. त्यास सहा मंजुरी मिळाल्याने आता स्थापत्य विभागाने या दोन्ही कामांसाठी निविदा मागविल्या आहेत. या कामाच्या ऑनलाइन निविदा प्राप्त झाल्यावर या कामासाठी ठेकेदार ठरवून त्यास कामाचे आदेश दिले जातील, अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘लोकमत’च्या माध्यमातून हा प्रश्न आठ ते दहा दिवसांत मार्गी लागल्याने सुपा कारखानदार संघटनेचे अध्यक्ष अनुराग धूत, जाफा पशुखाद्यनिर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक भागवत चव्हाण, आम इंडियाचे एचआर संदीप गोखले, यशराज उद्योग समूहाचे संचालक सुनील थोरात, इंस्पायरचे प्रमोद पठारे, बालाजी ट्रेडर्सचे संदीप लोहाडे, वाघुंडे गावचे माजी सरपंच संदीप मगर, गणराज इस्पातचे संचालक गौरव दुग्गड व प्रतीक चोरडिया आदींनी धन्यवाद दिले असून, स्थापत्य विभागाचे अभियंता गणेश वाघ, प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी यांचे आभार मानले.
फोटो : २२ सुपा न्यूज