दोन तासातच झाला लुटमारीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 01:19 PM2019-11-03T13:19:08+5:302019-11-03T13:19:38+5:30
स्वता:त सोने देऊन पुण्यातील एका व्यापा-याची पावणे चार लाखांची फसवणूक करणा-या एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी दोन तासातच रंगेहाथ पकडले.
भिंगार : स्वता:त सोने देऊन पुण्यातील एका व्यापा-याची पावणे चार लाखांची फसवणूक करणा-या एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी दोन तासातच रंगेहाथ पकडले. लुटमारीची ही घटना नगर तालुक्यातील साकत येथे शुक्रवारी पहाटे घडली होती.
याबाबत पुणे येथील व्यापारी संभाजी शिवाजी इंदळकर (वय ४४, रा. भारती विद्यापीठ परिसर, पुणे) यांनी शुक्रवारी नगर तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. यादृष्टीने पोलिसांनी आरोपींचा तपास सुरू केला होता. संभाजी इंदळकर यांना अनोळखी नंबरवरुन फोनद्वारे तीन लाखात अर्धा किलो सोने देतो, अशी बतावणी करुन नगर येथील सोलापूर रोडवरील साकत गावाजवळ एका निर्जनस्थळी शेतात बोलावून घेतले. यावेळी इंदळकर हे शुक्रवारी पहाटे येथे आले. यावेळी ८ अनोळखी इसमांनी त्यांच्याकडून तीन लाख रुपये रोख रक्कम, मनगटी घड्याळ, मोबाईल फोन, गॉगल तसेच वॉलेट व ओळखपत्रे असे असा एकूण तीन लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता, असे इंदळकर यांनी फिर्यादीत म्हटले होते. यावेळी त्यांनी पोलिसांना आरोपींचे वर्णन सांगितले होते. त्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला होता.
दरम्यान, अहमदनगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल भगवान गांगर्डे, विनोद पवार, संदीप जाधव, संदीप पवार हे वाळकी गावात आरोपींचा शोध घेत होते. यावेळी असताना वाळकी येथे एक संशयीत इसम फिरताना आढळला. त्यास हटकले असता तो पोलिसांना पाहून पळू लागला. त्यास पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. त्याची चौकशी कसून चौकशी केली असता त्याने समाधन गजानन काळे (वय २७, रा.दहिगाव, ता. जि. अहमदनगर) असे नाव सांगितले.
आरोपीकडे आढळले फिर्यादीचे पॅनकार्ड
आरोपीची पोलिसांनी झाडाझडती घेतली. यावेळी त्याच्याकडे ४० हजार रुपये किंमतीचे मनगटी घड्याळ, इंदळकर यांचे पॅनकार्ड, मतदान कार्ड, ए.टी. एम.कार्ड, एक हजार किमतीचा व ५ हजार रुपये किमतीचा असे दोन मोबाईल असा एकूण ४६ हजार रुपये किंमतीचा ऐवज आढळून आला. यावरुन पोलिसांनी आरोपीस अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून इतर ७ साथीदारांचे नावे निष्पन्न झाले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे व सहकारी करीत आहेत.