गरिबांची भूक भागविणारी रॉबिनहूड आर्मी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 11:27 AM2018-08-05T11:27:16+5:302018-08-05T11:27:23+5:30
जगातल्या ५२ देशात आणि भारतातील १०० शहरात निराधाराची भूक भागविणाऱ्या राबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेने नगर शहरातही उपक्रम सुरू करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले २० सदस्य सध्या या सामाजिक उपक्रमात सक्रिय काम करत आहेत.
अहमदनगर : जगातल्या ५२ देशात आणि भारतातील १०० शहरात निराधाराची भूक भागविणाऱ्या राबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेने नगर शहरातही उपक्रम सुरू करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले २० सदस्य सध्या या सामाजिक उपक्रमात सक्रिय काम करत आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून रॉबिनहूड आर्मीचे कार्य आणि उपक्रमाचा उद्देश सांगून अन्न गोळा केला जाते. लग्नकार्य, मूंज, वाढदिवस यासह अन्नदात्यांकडून खाणेयोग्य अन्न संकलित करून दर रविवारी शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, झोपडपट्टी येथे राहणा-या निराधार, गरिबांपर्यंत हे अन्न पोहोचविले जाते.
नगर शहरात जानेवारी २०१८ पासून अमित भांड, रूपेश नायर, परेश भाटे, अमित कोठारी, शंतनू संत, चिराग शेटिया, शुभम खोट, शुभम कुलकर्णी, शिरिष लहाडे, अमोल लोढा, भूषण डुंगरवाल, संतोष सरवदे, वासुदेव सचदेव, वैशाली मालपाणी, ज्योती हिमनानी, योगिता मुथा, डॉ. शमा मंत्री या सदस्यांनी रॉबिनहूड आर्मीचा हा सामाजिक उपक्रम सुरू केला. या कामाला शहरातील नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शहरात विविध ठिकाणी ४५० ते ५०० निराधार, गरीब विविध ठिकाणी राहतात़ यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे मात्र उत्पादनाचे कोणतेही साधन नाही. यातील बहुतांशी जणांना भिक्षा मागून उपजिवका भागवावी लागते. उपाशीपोटी राहणा-या निराधारांची भूक भागावी आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस त्यांना पौष्टिक अन्न मिळावे, या उद्देशातून शहरात रॉबिनहूड आर्मी कार्यरत करण्यात आली आहे.
५०० गरिबांना सात किलो धान्य देणार
रॉबिनहूड आर्मीच्या माध्यमातून १५ आॅगस्ट रोजी शहरातील ५०० गरिबांना सात किलो धान्याची बॅग देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आर्मीतील सदस्यांनी जनसंपर्क सुरू केला असून, नागरिकांमधून त्यांना प्रतिसाद मिळत आहे.
भुकेलेल्या गरिबांपर्यंत अन्न पोहोचावे, अन्नाची होणारी नासाडी थांबावी याच उद्देशातून नगर शहरात रॉबिनहूड आर्मीची शाखा सुरू करण्यात आली आहे. या अर्मीतील प्रत्येक सदस्य वेळ काढून अन्नसंकलनासाठी काम करतो. संकलित केलेले अन्न आधी सदस्य खातात. ते दर्जेदार आहे का याची पाहणी केल्यानंतरच ते निराधारांना दिले जाते. दर रविवारी ४०० ते ४५० जणांना अन्न दिले जाते. अन्नादान करणा-यांनी ९०११००९१३४ या क्रमांकावर संपर्क करावा.
- अमित कोठारी, अमित भांड, परेश भाटे सदस्य-रॉबिनहूड आर्मी