नेवासाफाटा येथे झोपडपट्टी धारकांचे रास्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 12:31 PM2019-09-04T12:31:20+5:302019-09-04T12:31:24+5:30
तहसीलदारांनी शासनस्तरावर आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले
भानसहिवरा : नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील वनविभागाच्या अखत्यारितील सुमारे १२ हेक्टर ८२ आर क्षेत्रापैकी ४ हेक्टर क्षेत्र गावठाणाच्या विस्तारासाठी घरकूल व विविध शासनाच्या योजना राबविण्याच्या ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी मंगळवार नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे राजमुद्रा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
अॅड. बन्सी सातपुते म्हणाले, वनविभागाचे १२ हेक्टर ८२ आर क्षेत्र असून वनविभागाच्या जागेवर सुमारे ४७ वर्षांपासून गोरगरीब लोक चार हेक्टर क्षेत्रावर वास्तव्य करत आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी चार हेक्टर क्षेत्र ग्रामपंचायतीसाठी वर्ग केल्यास त्यांना मूलभूत सुविधा मिळू शकतात. त्या दृष्टीने शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे. गोरगरिबांना मूलभूत सेवा मिळण्यासाठी चार एकर क्षेत्र वनविभागाने ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी शासन स्तरावर कायदेशीर मार्गाने कागदपत्रांची पूर्तता केली जाईल असे सांगितले.
मुकिंदपूरचे सरपंच सतिष निपुंगे म्हणाले, वनविभागाच्या जागेत सुमारे ४७ वर्षांपासून गोरगरीब लोकांनी येथे वस्ती केली आहे. त्यांना मूलभूत सुविधा देण्यासाठी मोठा निधी ग्रामपंचायतीकडे पडून आहे. मात्र जागेच्या प्रश्नामुळे त्यांना मूलभूत सुविधा व लोकवस्तीमध्ये विकास करण्यासाठी खोळंबा होत आहे.
यावेळी नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना रास्ता रोको प्रसंगी निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी शासनस्तरावर आपल्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले. या रास्ता रोको प्रसंगी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
यावेळी मुकिंदपूरचे सरपंच सतिष निपुंगे, राजू साळवे, अॅड. बन्सी सातपुते, अशोक करडक, भाऊ सदाफुले, राजू बोलके, अमित मेहर, महेश निपुंगे, संजय निपुंगे, ग्रामपंचायत सदस्य माउली देवकाते, गणेश माटे आदींसह झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.