तलाठी भरतीबाबतचा ‘तो’ गोपनीय अहवाल खुला करा; बाळासाहेब थोरात, रोहित पवारांचं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 10:58 PM2024-08-04T22:58:02+5:302024-08-04T22:59:18+5:30
माजी महसूलमंत्र्यांच्या काळात तलाठी आणि प्रातांधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेटकार्ड छापले होते, असा आरोप विखे पाटील यांनी केला होता.
अहमदनगर - तलाठी भरतीसंदर्भात प्रशासनाने राज्य शासनाला फेब्रुवारीमध्ये गोपनीय अहवाल पाठवला होता. मात्र, त्यावर शासनाने काहीही कार्यवाही केलेली नाही. हिम्मत असेल तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तो अहवाल खुला करावा, असे आव्हान माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आमदार रोहित पवार यांनी विखे यांना रविवारी ‘एक्स’वरून दिले.
तलाठी भरतीमध्ये पैशांचा व्यवहार झाला असा आरोप करीत व्यवस्था बदनाम करण्याचा दुर्दैवाने प्रयत्न झाला. पण, सरकारचा पारदर्शक कारभार असल्याने पहिल्यांदाच तलाठी भरती पारदर्शक पद्धतीने पार पडली, असे सांगत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भ्रष्टाचार झाला असेल तर राजकीय संन्यास घेईन, असे सांगत माजी महसूलमंत्र्यांच्या काळात तलाठी आणि प्रातांधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रेटकार्ड छापले होते, असा आरोपही केला. त्यावर थोरात-पवार यांनी विखे यांनाच थेट आव्हान देत सदरचा अहवाल खुला करावा, असे ‘एक्स’वर म्हटले आहे.
थोरात यांनी एक्सवर म्हटले आहे की, तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांची अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा 'पारदर्शक कारभार' उघडा पडेल. बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूलमधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे. सत्य काय ते सगळ्यांना माहीत आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को...’ असे झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मीही पाठवतो, असेही आमदार थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महसूल मंत्री @RVikhePatil
— Balasaheb Thorat (@bb_thorat) August 4, 2024
तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या,
असे मी म्हणणार नाही.
मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत…
रोहित पवार यांनी एक्सवर म्हटले आहे की, सरकारी यंत्रणेमध्ये अनेक अधिकारी पारदर्शक यंत्रणेसाठी प्रयत्नशील असतात. आपल्यात हिम्मत असेल तर ही फाईल पब्लिक करून त्यावर स्पष्टीकरण द्यावे आणि खरा महाभाग कोण हे महाराष्ट्राला सांगावे.