'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार पीकविम्याची रक्कम; रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 10:41 AM2020-02-10T10:41:46+5:302020-02-10T10:51:39+5:30
आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता.
अहमदनगर ( कर्जत ) : अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना सन २०१८ मधील रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळाली नाही. त्यांना कागदपत्रांची पुर्तता करण्याची संधी देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे अडकलेले पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता. त्यानुसार त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत ७० टक्के शेतकऱ्यांना त्यांचे अडकलेले पिकविम्याची रक्कम मिळाली आहे. पण तरीही आधार लिंक न केल्याने किंवा अन्य तांत्रिक कारणांमुळे अजूनही ३० टक्के शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळालेले नाहीत.
या शेतकऱ्यांनी पुन्हा आमदार रोहित पवार यांच्याशी संपर्क साधून यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे आणि मुख्य सांख्यिकी उदय देशमुख यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. कृषी आयुक्तांनीही तातडीने संबंधित विमा कंपनीच्या आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना परत एकदा त्रुटींची पूर्तता करण्याची संधी देण्याचे मान्य केले.
त्यानुसार येत्या काही दिवसांत राहिलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल नंबरवर एक एस.एम.एस येईल. त्यानुसार आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन या शेतकऱ्यांना अपुऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
निवडणुकीपूर्वी शेतक-यांना त्यांच्या पिकविम्याचे अडकलेले पैसे मिळवून देण्याचा शब्द मी दिला होता. त्यानुसार कृषी आयुक्तांची भेट घेऊन त्यांना हा विषय मांडला. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन तत्परतेने संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पावले उचलली. प्रशासनात सकारात्मक विचार करुन लोकांना न्याय मिळवून देणारे अनेक अधिकारी आहेत. ही चांगली गोष्ट असून सगळ्याच अधिकाऱ्यांनी प्रशासन चालवताना अशी लोकाभिमुख भूमिका घेतली तर अनेक प्रश्न सुटू शकतात.रोहित पवार ( आमदार, कर्जत- जामखेड )