Video: शेतकऱ्यांचं निवेदन न घेताच निघून गेले रोहित पवार, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 10:09 AM2023-05-21T10:09:59+5:302023-05-21T10:11:02+5:30
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार आपल्या कार्यशैलीमुळे कायम चर्तेत असतात. कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसाठी ते सातत्याने मंत्रालयात संबंधित खात्याच्या प्रमुखांना, अधिकाऱ्यांना नेतेमंडळींना भेटत असतात. तसेच, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरही टीका करताना दिसून येतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठीही सरकारला धारेवर धरतात. मात्र, कर्जत-जामखेड मतदारसंघातील काही शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी, ते रागारागात निघून गेल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा ते जुनी वाकी या रस्त्याचा प्रश्न आहे. यासाठी या भागातील ग्रामस्थ पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. रोहित पवार शुक्रवारी या भागात आल्याची माहिती मिळाल्यावर ग्रामस्थ त्यांना भेटायला निवेदन घेऊन गेले. खर्डा येथे रोहित पवार येताच शेतकऱ्यांनी त्यांचे वाहन अडविले. गाडीसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. शेतकऱ्यांना वाटले की पवार गाडीतून खाली उतरून आपले निवदेन स्वीकारतील. मात्र रोहित पवार गाडीतून उतरले आणि खाली बसलेल्या शेतकऱ्यांसमोरून चालत पुढे जाऊन दुसऱ्या गाडीत बसून पुढील दौऱ्यावर निघून गेले. काही जणांनी त्यांना हाक मारली. तरीही त्यांनी लक्ष दिले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तर, येथील स्थानिक भाजप नेत्यांनीही व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे. त्यामुळे, रोहित पवार यांच्या वागण्याची मतदारसंघात चर्चा रंगली होती.
आमदार रोहित पवारांची शेतकऱ्यांप्रती असलेली असंवेदनशीलता आली समोर!
— Sachin Potare (@SachinPotare1) May 19, 2023
😱 बसा तिकडेच, म्हणत आमदार रोहित पवार दुसर्या गाडीत बसून भुर्र..! साध्या भोळ्या शेतकऱ्यांचं साधं निवेदन पण हातात न घेणारा आमदार कशाला पाहिजे रे...#असला_आमदार_नको_रे_बाबा....🙄🙄#दादा_गेले_पळून#rohitpawar… pic.twitter.com/veel8WPO6Q
रोहित पवार यांनी त्याचदिवशी रात्री उशिरा संबंधित गावातील आंदोलकांना भेट दिली. तत्पूर्वी गावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याच्या ते घरी आले. त्यानंतर, त्या आंदोलक शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही देण्यात आले. या घटनेचेही फोटो नंतर व्हायरल झाले आहेत. मात्र, रोहित पवार अचानक असे केस वागले, याची चर्चा दिवसभर मतदारसंघात आणि सोशल मीडियावरही रंगली होती.