कोविड सेंटरमध्ये रोहित पवार थिरकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:11+5:302021-05-25T04:24:11+5:30

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी संवाद साधला. यावेळी ...

Rohit Pawar shuddered at the Kovid Center | कोविड सेंटरमध्ये रोहित पवार थिरकले

कोविड सेंटरमध्ये रोहित पवार थिरकले

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमधील रुग्णांशी आमदार रोहित पवार यांनी सोमवारी सायंकाळी संवाद साधला. यावेळी रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये झिंगाटचे गाणे लावले. त्या गाण्यावर रुग्णांनी डान्स केला. त्यामध्ये सहभागी होत आमदार पवार यांनीही झिंगाटवर डान्स केला. यामुळे रुग्णही भारावून गेले.

कर्जत तालुक्यात आमदार रोहित पवार व कर्जत - जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला आमदार पवार यांनी सोमवारी सायंकाळी भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांशी बोलताना ते म्हणाले, आपली इच्छाशक्ती चांगली ठेवा. इच्छाशक्तीमुळे कोरोनाला हरवता येते. सर्वांनी आपापली काळजी घ्यावी. कोरोना झाला म्हणून कोणीही घाबरू नये. मस्त व मजेत राहा, लवकर बरे व्हाल, असा संदेशही त्यांनी दिला. या संवादानंतर कोविड सेंटरमध्ये सैराटमधील झिंगाट हे गाणे लावण्यात आले. गाणे लावताच रुग्णांनी ताल धरला. यावेळी रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी आमदार पवारही थिरकले. त्यांनी रुग्णांमध्ये मिसळून डान्स केला. त्यामुळे कोविड सेंटरमधील वातावरण पार बदलून गेले. वातावरणात एकदम उत्साह संचारला. यावेळी आमदार पवार यांच्यासोबत एका वृद्ध आजीबाईने तसेच मुलांनीही डान्स केला.

-----

नृत्य करणारे पहिलेच पवार

पवार घराण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. तेही अनेक कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र, सार्वजनिक ठिकाणी नृत्य करणारे रोहित पवार हे पहिलेच पवार आहेत. रोहित पवार यांच्या नृत्यामुळे आमच्यात उत्साह भरल्याचे यावेळी रुग्णांनी सांगितले.

--

फोटो- २४ रोहित पवार डान्स

कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांसमवेत आमदार रोहित पवार यांनी ‘झिंगाट’वर डान्स केला.

Web Title: Rohit Pawar shuddered at the Kovid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.