सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट

By महेश गलांडे | Published: October 10, 2020 02:12 PM2020-10-10T14:12:22+5:302020-10-10T16:34:26+5:30

''राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा.... तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे

Rohit Pawar slammed gopichand Padalkar's criticism on social media about road of karjat jamkhed | सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट

सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी, पडळकरांच्या टीकेचा रोहित पवारांकडून कडेलोट

ठळक मुद्देपवारांच्या खांद्यावर बसून अशा शब्दात पडळकरांनी केलेल्या टीकेचा कडेलोट रोहित पवारांनी केला. आपण कुणाच्या कडेवर आहात, असे म्हणत निशाणा साधला.

मुंबई - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्या टीकेला भलंमोठ्ठ उत्तर दिलंय. फेसबुकवरुन पोस्ट करत, गोपीचंद पडळकरांनी विषयाला हात घातला याचा मला मनातून आनंद झाल्याचं रोहित यांनी म्हटलंय. त्यामुळे, पवार आणि पडळकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी सुरू झाल्याचं दिसून येतंय. पडळकर यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात जाऊन रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यास, उत्तर देताना रोहित यांनी गेल्या 25 वर्षांची आठवण करुन दिली आहे. तसेच, पवारांच्या खांद्यावर बसून अशा शब्दात पडळकरांनी केलेल्या टीकेचा कडेलोट रोहित पवारांनी केला. आपण कुणाच्या कडेवर आहात, असे म्हणत निशाणा साधला.

''माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे म्हणत खराब रस्त्याचं खापर भाजपा नेत्यांवरच फोडले आहे. 

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत.
आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय... ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका, असे म्हणत रोहित पवारांनी गोपीचंद पडळकरांना चिमटा लगावला.

''राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा.... तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. 

काय म्हणाले होते पडळकर

भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांच्यावर कडक शब्दात टीका केली आहे. औरंगाबादला जाताना, रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्त्यावर उतरुन पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ''रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. आपण खूप मोठे नेते झालो आहोत, या अविर्भावात ते असतात. मात्र, शरद पवार यांच्या खांद्यावरुन तुम्ही तुमची उंची मोजू नका. रोहित दाद, जरा पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल,'' अशा शब्दात पडळकर यांन रोहित पवारांवर थेट कर्जत-जामखेड मतदारसंघातून टीका केली.
 

Web Title: Rohit Pawar slammed gopichand Padalkar's criticism on social media about road of karjat jamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.