'इंदिरा गांधींच्या काळापासून रखडलेला पाण्याचा प्रश्न रोहित पवारांनी सोडवला', शरद पवारांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 02:02 PM2022-05-31T14:02:52+5:302022-05-31T14:05:04+5:30
Sharad Pawar & Rohit Pawar: आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
अहमदनगर - महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यावेळी कर्जत-जामखेड तालुक्यातही मोठा दुष्काळ पडला होता. येथील दुष्काळ हे जुनं दुखणं आहे. या तालुक्यातील दुष्काळ पाहण्यासाठी शेजारच्या अकोले गावात दुष्काळ पाहण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आल्या होत्या. त्यांनी येथील दुष्काळाची स्वत: पाहणी केली. मात्र दुर्दैवाने त्यावेळेपासून आजपर्यंत येथील दुष्काळ हटला नाही. पाण्याचा, उद्योगाचा प्रश्न सुटला नाही. मला सांगायला आनंद होत आहे की रोहित पवार यांनी या भागात पाणी, उद्योगाचे प्रश्न सोडविले, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
जामखेड तालुक्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. या कार्यक्रमास मंत्री धनंजय मुंडे, आमदार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, आमदार उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी आजचा दिवस महिलांच्या आत्मसन्मानाचा, अधिकार वाढविण्याचा दिवस आहे.
रोहित पवार या तरुणाच्या हाती सत्ता दिली, याचा आनंद आहे. त्याने अनेक कामे केली. त्या कामात अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा स्पर्श आहे. अहिल्यादेवी यांनी लोकांना बारवेतून पाण्याची सुविधा दिली. हाच पाण्याचा प्रश्न घेऊन दोन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रोहित पवार यांनी मंत्रालयात अनेक बैठका घेतल्या. आगामी काळात दोन्ही तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल. रोहित पवार यांनी या भागात एमआयडीसीहोईल. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागात लवकरच एमआयडीसी येईल, याची पूर्ण तयारी झाली आहे. अहिल्यादेवी यांचे दळणवळणाचे प्रश्न सोडविले. तोच विचार घेत रोहित पवार यांनी या दोन तालुक्यातून दोन महामार्ग मंजूर करून घेतले.
गोपीचंद पडळकर यांना अडवले
भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना दुपारी दोन नंतर चौंडीत येण्याची पोलिसांनी परवानगी दिली होती. मात्र शरद पवार यांचे भाषण सुरू असतानाच त्यांनी चौंडीत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले.त्यांच्यासोबत सदाभाऊ खोत हेही होते. त्या दोघांनाही आधी चापडगाव येथे व नंतर चौंडीच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. यावेळी दोघांच्या समर्थकांनी पवारांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच चौंडीतील कार्यक्रम राष्ट्रवादीने हयजँक केल्याचा आरोप यावेळी केला.