रोहयोचे बजेट ठरणार ‘कामा’वर
By Admin | Published: August 10, 2014 11:26 PM2014-08-10T23:26:27+5:302014-08-10T23:28:58+5:30
अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे.
अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे २०१५-१६ चे बजेट हे कामावर आधारित असणार आहे. यात गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या आणि चालू वर्षी मंजूर कामांची सरासरी विचारात घेण्यात येणार आहेत. यंदा रोहयोचे बजेट तयार करण्यासाठी प्रत्येक गावात ११ विशिष्ट घटकांचे घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यात होणाऱ्या मागणीनुसार बजेट तयार करण्यात येणार आहे. हे १४ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येते. यापूर्वी दरवर्षी १५ आॅगस्टला होणाऱ्या ग्रामसभेत जिल्हाभर प्रत्येक ग्रामपंचायतीत रोहयोचा वर्षभराचा आराखडा तयार करण्यात येत असे. मात्र, यंदा शासनाने ही पध्दत बदलली आहे. यापुढे रोहयोचा आराखडा तयार करण्यापूर्वी प्रत्येक गावात ग्रामरोजगार सेवक यांच्या मार्फत सर्वेक्षण करण्याच्या सूचना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वेक्षणात होणाऱ्या कामांच्या आणि रोजगारांच्या मागणीवर आधारित बजेट तयार करण्यात येणार आहे.
८ ते १४ आॅगस्ट हा सर्वेक्षणाचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. या दरम्यान प्रत्येक गावात ११ प्रकारातील विशिष्ट प्रवर्गातील कुटुंबाची माहिती आणि जॉब कार्ड, कामांची मागणी याची नोंद घेण्यात येणार आहे.
तसेच सन २०१३-१४ मध्ये झालेली कामे आणि २०१४-१५ मध्ये मंजूर कामांच्या आधारे २०१५-१६ चा आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामुळे यंदा पासून रोहयोचा आराखडा ग्रामसभेत ढोबळ मानाने तयार न करता, प्रत्यक्षात झालेली कामे, मंजूर कामे आणि मागणीवर आधारित राहणार आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे गावागावात ग्रामरोजगार सेवकांमार्फत सर्वेक्षण सुरू झाले आहे. येत्या १४ तारखेपर्यंत सर्वेक्षणावर आधारित मागणी संकलित होणार आहे.
(प्रतिनिधी)