शिर्डी मतदारसंघात भाजपची मोठ्या भावाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 04:29 PM2019-04-14T16:29:27+5:302019-04-14T16:31:18+5:30
शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष मित्र व मोठ्या भावाची भूमिका बजावत आहेत
शिवाजी पवार
श्रीरामपूर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी भारतीय जनता पक्ष मित्र व मोठ्या भावाची भूमिका बजावत आहेत. मतदारसंघात कोपरगाव आणि नेवासा येथील आमदार तसेच अकोले व श्रीरामपूरात पक्षाच्या ताकदीमुळे मजबूत युती झाल्याचे पहायला मिळत आहे. डॉ.सुजय विखे हे अंतिम टप्प्यात येथे प्रचारात उतरतील.
शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे व राज्यमंत्री दादा भुसे यांनी सर्व सहा विधानसभा क्षेत्रात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैैठका घेऊन समन्वय घडवून आणला. भाजपच्या पातळीवर कुठलीही नाराजी व किंतू परंतू राहणार नाही याची काळजी दोन्ही बाजूने घेण्यात आली. त्यामुळे उमेदवार लोखंडे यांच्या समवेत मतदारसंघात सेना-भाजप सारख्याच ताकदीने उतरल्याचे आज चित्र आहे.
मतदारसंघात भाजपने सर्व मतदान केंद्रांवर समित्या आणि प्रमुखांची नियुक्ती केली आहे. भाजपने संघटनात्मक बांधणीसाठी येथे नऊ मंडले स्थापन केली. त्यावर कार्यकारिणी नेमण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या वाररूममधून या पदाधिकाऱ्यांची तपासणी व चाचपणी केली गेली, असा दावा भाजप पदाधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
पक्षाचे कोपरगाव येथून स्नेहलता कोल्हे व नेवासेतून बाळासाहेब मुरकुटे हे विधानसभा सदस्य आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणूक होत असल्याने दोघांसाठी ही रंगीत तालीम मानली जाते. पक्षाला मताधिक्य मिळवून देण्याचा दोघांचाही प्रयत्न आहे.
अकोले तालुक्यातून पक्षाचे जालिंदर वाकचौरे, डॉ.किरण लहामटे, सुनीता भांगरे हे तीन जिल्हा परिषद सदस्य येतात. मतदारसंघात येणाºया राहाता पालिकेत ममता पिपाडा, देवळाली प्रवरात सत्यजीत कदम व नेवासेत संगीता बर्डे हे पक्षाचे नगराध्यक्ष आहेत. श्रीरामपूर विधानसभेत मागील निवडणुकीत भाजपने दुसºया क्रमांकाची ४६ हजार मते घेत छाप सोडली. संगमनेर तालुक्यात पक्षाला निवडणुकात पुरेशे यश मिळालेले नाही. मात्र, संघटन बांधणीचे काम चांगले आहे. नगरचे उमेदवार डॉ.सुजय विखे हे २३ एप्रिलनंतर शिर्डीत प्रचारात सक्रिय होतील. येथे २९ रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असल्याने सेना उमेदवारास विखे यांची कूमक मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारने केलेल्या विकास कामांवर आम्ही मते मागणार आहोत. सरकारने व खासदारांनी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत घेऊन जात आहोत. शिवसेनेच्या नेत्यांसमवेत आम्ही भाजपच्या बुथ प्रमुखांची बैैठक घेत व्यूहनीती आखली आहे. - सचिन तांबे, जिल्हा कार्याध्यक्ष, भाजप.
राहाता : तालुक्यात पक्षाची ताकद चांगली आहे. संपर्क प्रमुख आमदार दराडे, राज्यमंत्री दादा भुसे यांच्या समवेत संयुक्त मेळावा पार पडला. भाजपने शिवसेनेसोबत एकत्रित बैैठका घेत समन्वय घडवून आणला. राजेंद्र पिपाडा, नितीन कापसे, सचिन तांबे, नंदू जेजूरकर, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर यांच्यावर पक्षाची भिस्त आहे.
कोपरगाव : येथे प्रामुख्याने आमदार स्नेहलता कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्यावर पक्षाची भिस्त आहे. आमदार कोल्हे यांनी स्वत: उमेदवारासमवेत शहरातून फेरी काढली. ग्रामीण भागाचा लवकरच दौरा करणार आहेत.
श्रीरामपूर : जिल्हा संघटन सरचिटणीस प्रकाश चित्ते, नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र चव्हाण, सतीश सौदागर, अभिजित कुलकर्णी, मनोज हिवराळे हे येथे काम पाहत आहेत. पक्षाची संघटनात्मक ताकद येथे मोठी आहे. याशिवाय देवळाली प्रवरा येथून माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजीत कदम हे काम पाहत आहेत.
अकोले : येथे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या बरोबर भाजपने तालुक्यात तीन मेळावे घेतले. पक्ष कार्यालय सुरू झाले असून सेनेशी चांगला समन्वय दिसतो आहे. जालिंदर वाकचौरे, सीताराम भांगरे, डॉ.किरण लहामटे, भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर येथे प्रचाराची प्रमुख जबाबदारी आहे.
संगमनेर : येथे शहर व तालुक्यात दोन्ही ठिकाणी भाजपची प्रचार यंत्रणा सक्रिय झाली आहे. उमेदवार लोखंडे यांच्यासह शहरात मेळावा पार पडला. तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, राम जाजू, राजेंद्र सांगळे, दिनेश सोमाणी हे प्रचार प्रमुख आहेत.
नेवासे : भाजपचे आमदार मुरकुटे हे सक्रिय झाले आहेत. तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, लोकसभा विस्तारक नितीन दिनकर, सचिन देसरडा, दिनकर गर्जे, अनिल ताके यांच्यावर येथे प्रचाराची जबाबदारी आहे.