राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:19 AM2021-01-04T04:19:19+5:302021-01-04T04:19:19+5:30

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव ...

The role of political parties in the bouquet | राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

राजकीय पक्षांची भूमिका गुलदस्त्यात

अहमदनगर : पुणे आणि औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून राजकारण तापले असताना नगरमध्ये मात्र हवा थंड असल्याचे दिसते आहे. शहराचे नाव बदलण्याबाबत राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनाही रस नसल्याचे दिसते आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अंबिकानगर नामकरण करण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे शहर शिवसेनेने सांगितले. याव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांना या विषयात रस नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

औरंगाबादच्या नामांतराचा वाद पुढे आल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मागणीही शिवसेनेने केली आहे. शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे. लोखंडे हे फक्त माध्यमांशी बोलले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी कोणाकडेही मागणी केलेली नाही. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर व्हावे, ही जनतेची इच्छा आहे. त्यासंबंधी आमचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. मात्र, औरंगाबादपाठोपाठ अहमदनगरचेही नामांतर होऊन या शहराला अंबिकानगर नाव देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगून लोखंडे यांनी नगरच्या नामांतराची हवा गरम करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नगर शहरातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षांचे नेते यांनी मात्र कानाडोळा केला आहे. या विषयावर काय बोलायचे, यात आम्हाला फारसा रस नसल्याचेच नगर शहरातील राजकीय नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे औरंगाबादच्या नामांतराचा विषय आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीरपणे मांडली आहे. त्यामुळे नगरमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही नगरच्या नामांतराबाबत चिडीचूप आहेत. सेनेच्या खासदारांनी मागणी केल्यानंतर ती उचलून धरण्यात नगर शहर शिवसेनेलाही रस नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे नगर शहराच्या नामांतराचा मुद्दा ऐरणीवर येण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महापौरांनीही नामांतराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून, महापालिकेतील नगरसेवकांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही. दरम्यान, अहमदनगर शहराचे नाव बदलले तर जिल्ह्याचे नावही बदलेल. त्यामुळे नामांतराचा प्रश्न काही एकट्या शहरापुरता नाही, अशी भूमिका शहरातील नेत्यांनी मांडली आहे.

---------

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचीच होती इच्छा

राज्यात १९९५ मध्ये पहिल्यांदा युतीची सत्ता आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची नगरला वाडिया पार्कवर जाहीर सभा झाली होती. त्या सभेत त्यांनी अहमदनगरचे नाव अंबिकानगर करण्याचे आदेश दिले होते. नगरजवळील केडगाव येथील मंदिरातील रेणुकामाता ही अंबिकामाता म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिचेच नाव अहमदनगर शहराला द्यावे, असे त्यांनी या आदेशातून सुचवले होते; पण त्यावेळी राज्यात असलेल्या युती सरकारने या आदेशाची फारशी दखल घेतली नाही. त्यानंतर मागील २५-३० वर्षांत अधूनमधून ही नामांतर मागणी होत गेली. महापालिका निवडणुकीतही शिवसेनेच्या काही नगरसेवकांनीही अशी मागणी केली होती. आता शिवसेनेच्याच शिर्डीच्या खासदाराने पुन्हा ही मागणी करून विषय छेडला आहे; पण त्यांच्या या मागणीला स्थानिक जिल्ह्याच्या स्तरावर राजकीय पाठिंबा मिळणे कठीण असल्याचे दिसते आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख आता शिवसेनेत असले तरी त्यांच्याकडून या विषयाचा राज्य सरकारकडे पाठपुरावा होईल की नाही, याचीही उत्सुकता आहे.

-----------

पाचशे वर्षांचा इतिहास

पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमद निजामशहा याने नगरजवळील भिंगार येथे झालेल्या युद्धात जहांगीर खानचा पराभव केला. या विजयाप्रीत्यर्थ भिंगारजवळच भुईकोट किल्ला उभारण्याची व त्याच्याजवळ नगर शहर वसविण्याची मुहूर्तमेढ रोवली. तो दिवस होता २८ मे १४९०. हे शहर अहमद निजामशहाने वसविल्याने या शहराला अहमदनगर हे नाव पडले.

--------------------------

Web Title: The role of political parties in the bouquet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.