कोपरगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या छताला पहिल्याच पावसात गळती; वीस लाखांचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 02:30 PM2020-06-07T14:30:03+5:302020-06-07T14:30:55+5:30
कोपरगाव शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे.
रोहित टेके ।
कोपरगाव : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या संपूर्ण इमारतीचे पाच महिन्यापूर्वी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.५) झालेल्या पहिल्याच पावसात इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे शासनाने दुरुस्तीसाठी केलेला २० लाखांचा खर्च पाण्यात गेला असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव कार्यालयाच्यामार्फत या इमारतीचे संपूर्ण दुरुस्तीचे काम पाच महिन्यापूर्वी २० लाख खर्च करून कार्यालयासाठी कूपनलिका, फरशीचे पूर्ण काम, भिंतींची दुरुस्ती करून रंगकाम, छतावरील वॉटर प्रूफिंग, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासह इतरही कामे करण्यात आली होती. मात्र शासनाने एवढा खर्च करूनही पाचच महिन्यात भिंतींना तडे गेले.
यासंदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात २१ मे रोजीच्या अंकात वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली होती. त्यावेळी कोपरगाव येथील बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी इमारतीच्या दुरुस्तीचे काम गुणवत्तापूर्वक केले असून या इमारतीच्या मूळ पायातच दोष असल्याने इमारतीच्या भिंतींना तडे गेले असल्याचे सांगितले होते. मात्र गुणवत्तापूर्वक केलेल्या कामातून पहिल्याच पावसात छतातून पाण्याची गळती होत असल्याने गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तडे गेलेल्या भिंतींची तत्काळ दुरुस्ती करू असे सांगितले होते. तीही अद्यापपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही. कार्यालय परिसरातील कूपनलिकेत विद्युत मोटरही बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचाही विसर संबंधित विभागाला पडला आहे.
कार्यालय परिसरात साचले पावसाचे पाणी
विशेष म्हणजे कार्यालयाच्या बाहेरील परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविण्यात आले आहे. परंतु त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी बनविण्यात आलेल्या गटारीचे ढापे खूप उंचीवर बसविण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात साचलेले पावसाचे पाणीही त्या गटारीतून वाहत नसल्याने या परिसरातच पाण्याचे मोठे तळे साचले होते.