रुमचे भाडे थकल्याने मालकाने सामान केले जप्त; कुटुंब रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 11:42 AM2020-05-24T11:42:15+5:302020-05-24T11:43:03+5:30
भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे.
राहुरी : भाडोत्री रूमचे तीन हजार रुपये भाडे थकले म्हणून मालकाने भाडेकरुचे सामान जप्त केले आहे. १६ मे रोजी राहुरी शहरात ही घटना घडली. या घटनेने भाडेकरुला रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. यामुळे भाडेकरुने २३ मे रोजी पोलिसात धाव घेवून आपली कैफियत मांडली आहे.
बाबासाहेब बंडू निकम हे आपली पत्नी सुनीता व दोन छोट्या मुलांसह गेल्या एक वर्षापासून अण्णा कोरडे यांच्या मालकीच्या पंढरी मंगल कार्यालय शेजारी असलेल्या खोलीत दोन हजार रुपये महिना भाडे तत्वावर राहत होते. दरम्यान प्रत्येक महिन्याला बाबासाहेब निकम हे वेळेवर भाड्याची रक्कम अण्णा कोरडे यांच्याकडे देत होते. मात्र दोन महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळे बाबासाहेब निकम व त्यांची पत्नी सुनीता यांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे दोन महिन्याचे चार हजार रुपये घरभाडे थकले आहे. त्यापैकी एक हजार रुपये बाबासाहेब निकम यांनी अण्णा कोरडे यांना दिले होते. फक्त तीन हजार रुपये भाडे देणे बाकी होते. मात्र अण्णा कोरडे यांनी घर भाड्यासाठी निकम कुटूंबीयांकडे तगादा लावला. थोडे दिवस थांबा तुमचे सगळे घरभाडे आम्ही देऊ. असे निकम कुटूंबीयांनी अण्णा कोरडे यांना सांगितले. मात्र १६ मे रोजी बाबासाहेब निकम व त्यांची पत्नी सुनीता हे काही कामासाठी बाहेर गेले. यावेळी अण्णा कोरडे याने निकम राहत असलेल्या खोलीला बाहेरुन टाळे ठोकले. याबाबत निकम यांना अगोदर सगळे भाडे द्या. तेव्हाच तुमचे सामान देईल, अशी कठोर भूमिका अण्णा कोरडे यांनी घेतली. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बाबासाहेब बंडू निकम, त्यांची पत्नी सुनीता बाबासाहेब निकम व त्यांची दोन छोटी मुले यांच्यावर रस्त्यावर भटकण्याची वेळ आली आहे. सध्या रस्त्यावर बसून आपल्या छोट्या दोन मुलांना खाऊ-पिऊ घालण्याची वेळ बाबासाहेब निकम यांच्यावर आली आहे.
पोलिसांकडे मागितला न्याय
एकीकडे कोरोनामुळे रोजगार मिळत नाही. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राहुरी तालुक्यातील काही दानशूर व्यक्ती गरीब व गरजवंत कुटूंबांना शक्य होईल ती मदत करत आहे. तर एकीकडे केवळ तीन हजार रुपये घरभाडे थकले म्हणून निकम कुटूंबीयांचे घर सामान जप्त केल्याची घटना घडली आहे. बाबासाहेब निकम यांच्या कुटूंबीयांना कोण व कसा न्याय देणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मदतीसाठी निकम कुटूंबीयांनी २३ मे रोजी राहुरी पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला आहे.