पारनेर येथे घराच्या टेरेसवर बनवली रोपवाटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:41 PM2018-03-20T18:41:54+5:302018-03-20T18:42:18+5:30
शासकीय रोपांवर अवलंबून न राहता स्वत:च्या घरावरच रोपवाटिका तयार करून शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम पारनेर येथील वृक्षमित्र व शिक्षक लतिफ राजे यांनी केला आहे.
पारनेर : स्वत: वृक्षप्रेमी असल्याने अनेक ठिकाणी वृक्षलागवड केलीच, पण केवळ शासकीय रोपांवर अवलंबून न राहता स्वत:च्या घरावरच रोपवाटिका तयार करून शाळा, महाविद्यालयांना मोफत रोपे देण्याचा उपक्रम पारनेर येथील वृक्षमित्र व शिक्षक लतिफ राजे यांनी केला आहे.
पारनेर येथील लतिफ राजे हे ढवळपुरी येथील आश्रमशाळेत शिक्षक आहेत. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून पारनेर तालुक्यात वृक्षसंवर्धनासाठी काम सुरू केले असून आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला झाडे लावून वाढदिवस साजरा करणे, यातून तेथे त्यांनी सुमारे तीनशे ते चारशे झाडांचे वृक्षारोपण केले आहे. झाडे जगविण्यासाठी विद्यार्थ्यांची वनबँक सुध्दा तयार केली आहे. आनंद मेडीकल फौडेशनचे सचिव डॉ. सादीक राजे यांच्या पुढाकाराने चाटे किडस् व राजीव गांधी विद्यालयात सुध्दा लतिफ यांनी सुमारे तीनशे झाडांचे वृक्षारोपण केले आहे. तालुक्यात वृक्षप्रेमी म्हणून कार्यरत असताना त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पर्यावरण विभागाचा राज्यस्तरीय सृष्टीमित्र पुरस्कार मिळाला़ त्यानंतर त्यांना आणखी बळ मिळाले. आपल्या घराच्या टेरेसवर रोपवाटिका बनविण्याचा निर्णय घेतला. या रोपवाटिकेतून तयार झालेली रोपे ते शाळा, सामाजिक संस्था यांना मोफत देतात.
एक हजार रोपांचे वाटप
लतिफ राजे यांचे घर पारनेर येथील राजे मशिदीजवळ आहे. घराच्या टेरेसवर रोपवाटिका करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांची पत्नी शबाना, मुले आफराज व आतीफ हे सुध्दा त्यांना मदत करीत आहेत. उन्हाने रोपे जळू नये म्हणून खाली प्लायवुड टाकण्यात आले आहे. त्यावरून माती टाकण्यात आली आहे. छत म्हणून नेट टाकण्यात आले आहे. दरवर्षी यासाठी तीन- चार हजार रुपये खर्च त्यांना येतो. या रोपवाटिकेत आंबा, जांभूळ, चिंच, आवळा यासह अनेक फळझाडे आहेत. मित्रांचा किंवा नातेवाईकांचा वाढदिवस असल्यास ते फळझाडे भेट देतात. तर शाळा, महाविद्यालयांना पिंपळ, वड, सुबाभूळ, लिंब व इतर झाडे देतात. रोपवाटिकेत गेल्यावर सुमारे तीनशे-चारशे झाडे तजेलदार असल्याचे दिसून आले. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण जसा वेळ मिळेल तसे रोपांना पाणी देत असल्याचे लतिफ राजे यांनी सांगितले.