मुळा उजव्या कालव्यातून २० मार्चला आवर्तन सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:08 PM2020-03-16T16:08:03+5:302020-03-16T16:08:11+5:30
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली.
राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याला पाटबंधारे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे. उजव्या कालव्यातून २० मार्च रोजी उन्हाळी पहिले आवर्तन सुटणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. पाणी वापर संस्थांनी लेखी मागणी केली नसतांनाही शेतक-यांच्या दबाव तंत्रामुळे पाटबंधारे खात्याला कालव्यातून पाणी सोडण्यासाठी झुकावे लागले आहे.
मुळा पाटबंधारे खात्याकडे केवळ चारच संस्थांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे पाटबंधारे खाते कालव्यातून पाणी सोडण्यास राजी नव्हते. लेखी मागणी असल्याशिवाय पाणी सोडता येत नाही असा पाटबंधारे खात्याचा नियम आहे. मात्र नियम डावलून पाटबंधारे खात्याला मंत्र्यांच्या दबावापुढे झुकावे लागले आहे. डाव्या कालव्यातून ब्रिटीशकालीन पध्दतीचा अवलंब करून लेख मागणीनंतर पाणी सोडण्यात आले होते. मात्र उजव्या कालव्याकडे लेखी मागणी नसल्याने पाटबंधारे खाते काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
पाटबंधारे खात्याने पाणी सुटण्याचे प्रगटन मुदत १६ मार्च दिली होती. मात्र १६ मार्चपर्यंत केवळ १०० हेक्टरची मागणी नोंदविण्यात आली होती. पाणी वापर संस्थांनी ताठर भूमिका घेत लेखी मागणीकडे पाठ फिरविली. पाटबंधारे खाते व पाणी वापर संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. १९ मार्चपर्यंत कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण होणार आहे. रब्बी आवर्तन सोडण्यापूर्वीही दुरूस्ती करण्यात आली होती. मात्र रेतीमुळे पुन्हा दुरूस्तीची वेळ पाटबंधारे खात्यावर आली आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत पालकमंत्री हसन मुश्रीम यांनी हिरवा कंदील दाखविला होता. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याशिवाय मंत्री शंकरराव गडाख व लोकप्रतिनिधी यांनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता.