महागाईविरोधात आरपीआयचे ‘भीक मागो’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:31+5:302021-06-25T04:16:31+5:30
अहमदनगर : केंद्रातील मोदीप्रणीत भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅससह जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ...
अहमदनगर : केंद्रातील मोदीप्रणीत भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅससह जीवनावश्यक वस्तूंची भाव वाढ केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने चुकीचे धोरण राबवून प्रचंड प्रमाणात वाढवलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना भीक मागण्याची वेळ आल्याचा आरोप करीत केंद्र सरकारचा आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदविण्यात आला.
रामवाडी येथील पेट्रोल पंपासमोर झालेल्या आंदोलनात केंद्रातील भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, शहर सदस्य संतोष पाडळे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्याक शहर कार्याध्यक्ष आजीम खान, शहर प्रवक्ता जमीर इनामदार, शहर उपाध्यक्ष जावेद सय्यद, अंकुश भोरे, भीम वाघचौरे, विकी प्रभळकर, सोनू भंडारी, मंगेश गायकवाड, उमेश गायकवाड, दीपक उघडे आदी सहभागी झाले होते.
केंद्रातील भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, घरगुती एलपीजी गॅसचे दर वाढवून संपूर्ण देशात महागाईचा भडका उडविला आहे. २०१४ पासून सत्तेवर आलेल्या मोदीप्रणीत भाजप सरकारने महागाई कमी करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात महागाई करून ठेवली आले. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढले असून, सर्वसामान्य नागरिकांना जगणे अवघड झाले आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी सर्वसामान्य जनता जिवाचे रान करत आहे, तर दुसरीकडे महागाईचा आगडोंब उसळला आहे. विविध कर लादल्याने महागाई कमी होण्यास तयार नाही. पूर्वी गॅसची सबसिडी मिळत होती, आता सबसिडी न देता जनतेला खुल्या किमतीत गॅस खरेदी करावा लागत आहे. गॅसची किंमत ९३०वर पोहोचली आहे. कोरोनाच्या दोन वर्षांत सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालवलेली असताना, महागाईने सर्वसामान्यांना भीक मागण्याची वेळ आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किमती कमी कराव्या व जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीने करण्यात आली आहे.
.............
२४ भीक मागो आंदोलन
भाववाढीच्या निषेधार्थ नगर शहरातील रामवाडी येथील पेट्रोल पंपासमोर रिपाइंच्या वतीने भीक मागो आंदोलन करताना सुशांत म्हस्के, दानिश शेख, पवन भिंगारदिवे, संतोष पाडळे, नईम शेख, आजीम खान, जमीर इनामदार, जावेद सय्यद आदी. (छाया-वाजिद शेख, नगर)