वाळूठेकेदाराला २३ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 06:46 PM2019-01-09T18:46:14+5:302019-01-09T18:46:57+5:30
राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळू ठेकेदाराला तहसीलदारांनी ठोठावलेला २३ लाख ७१ हजार रूपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे़
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील नदीपात्रातून बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या वाळू ठेकेदाराला तहसीलदारांनी ठोठावलेला २३ लाख ७१ हजार रूपयांचा दंड जिल्हा न्यायालयाने कायम ठेवला आहे़
वाळूठेकेदार पवन पोपटराव कडू (रा़ सात्रळ) याने २०१० मध्ये सात्रळ येथील नदीपात्रातील १० हजार ब्रास वाळूउपसा करण्याचा लिलाव घेतला होता़ कडू याने मात्र घेतलेल्या लिलावाव्यतिरिक्त नदीपात्रातून बेकायदेशीररित्या ३१२ ब्रास वाळूचे उत्खनन केले़ याप्रकरणी राहुरी येथील तत्कालीन तहसीलदार अमित सानप यांनी पंचनामा करून ठेकेदार कडू याला २३ लाख ७१ हजार ३२५ रूपयांचा दंड ठोठावला होता़ या निर्णयाविरोधात कडू याने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता़ या प्रकरणात न्यायालयाने तहसीलदार यांनी दिलेला आदेश ठेकेदारावर बंधनकारक नाही असा निर्णय दिला होता़ दिवाणी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारच्यावतीने जिल्हा न्यायालयात दाद मागितली होती़ जिल्हा न्यायाधीश एस़व्ही़ माने यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली़ या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले़ सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिवाणी न्यायालयाने दिलेला आदेश रद्द करून ठेकेदाराला तहसीलदारांनी केलेला दंड कायम ठेवला आहे़ या निकालामुळे ठेकेदार पवन कडू याला दंडाची रक्कम भरावी लागणार आहे़