बाकड्यांवर २४ लाखांची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:26+5:302021-08-24T04:26:26+5:30

अहमदनगर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना बाकड्यांवर तब्बल २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महिला व बाल ...

Rs 24 lakh wasted on bucks | बाकड्यांवर २४ लाखांची उधळपट्टी

बाकड्यांवर २४ लाखांची उधळपट्टी

अहमदनगर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना बाकड्यांवर तब्बल २४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांसाठी ४८० बाकडी खरेदी करण्यात आली असून, अन्य पदाधिकारी नगरसेवकांची बाकड्यांची मागणी आहे. सर्वसामान्य नागरिकांकडून कर रुपाने वसूल करण्यात आलेल्या पैशांची उधळपट्टी थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या पुरवठा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सिमेंटची ४८० बाकडी खरेदी करण्यात आली आहेत. एका बाकड्यासाठी पालिकेला ५ हजार २०० रुपये मोजावे लागले. बाकड्यांसाठी एकूण २४ लाख रुपये खर्च झाला आहे. याशिवाय अन्य पदाधिकारी व नगरसेवकांनीही बाकड्यांची मागणी केलेली आहे. त्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आणखी बाकडी खरेदी केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २४ लाख रुपये खर्चून ४८० बाकडी कृष्णा सेल्स ॲण्ड कार्पोरेशन या संस्थेकडून खरेदी करण्यात आली आहेत. यापूर्वीही शहरात ठिकठिकाणी बाकडी बसविण्यात आली असताना नव्याने बाकडी बसवू नयेत. पूर्वीच्या बाकड्यांचे सर्वेक्षण करून माहिती घ्यावी. बाकडे बसविल्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. बाकड्यांवर बसून रात्री उशिरापर्यंत गप्पांचे फड रंगतात. त्यातून महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. असे असताना पदाधिकाऱ्यांकडून बाकडी बसविण्याचा फार्स केला जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने यापूर्वी करण्यात आला आहे. बाकड्यांबाबत मनसेने केलेल्या मागणीला केराची टोपली दाखवित आयुक्त शंकर गोरे यांनी बाकडी खरेदीला हिरवा कंदील दाखविला आहे. पुरवठा विभागाकडून बाकडी खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बाकडी बसविल्याने सामान्य नागरिकांचा त्रास कमी होण्याऐवजी वाढणार असल्याने ती बसवू नयेत, अशी मागणी पुढे येत आहे. परंतु, पदाधिकारी नगरसेवकांना सांगणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

.....

टक्केवारीसाठी बाकडी खरेदीचा घाट

यापूर्वी शहरात ठिकठिकाणी बाकडी बसविण्यात आली आहेत. शहरातील रस्ते, घरांसमोर, अपार्टमेंट, खुल्या जागेत बाकडी बसविण्यात आली आहेत. त्यामुळे नव्याने बाकडी बसवू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु, टक्केवारीसाठी नव्याने बाकड्यांची खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले.

Web Title: Rs 24 lakh wasted on bucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.