वाळूसह ९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 06:10 PM2019-11-09T18:10:11+5:302019-11-09T18:10:41+5:30
संगमनेर तालुक्यातील खैरदरा गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
घारगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांच्यासह पथकाने संगमनेर तालुक्यातील खैरदरा गावच्या शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजलेच्या सुमारास ही कारवाई केली. ३ ब्रास वाळूसह सुमारे ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोघेजण फरार झाले आहेत.
पोलीस नाईक अनिल रघुनाथ कडलग यांनी दिलेल्या फियार्दीवरून डंपर चालक संकेत हरिभाऊ लामखडे (रा.केळेवाडी, बोटा, ता.संगमनेर) याच्यासह मालक संतोष तुळशीराम शेलार (रा. अकलापूर, ता.संगमनेर) तर ट्रक चालक व मालक उबेद मन्सूर पटेल (रा.साकुर), यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित मोरे (रा.खैरदरा) जेसीबी चालक(नाव माहित नाही ) हे जेसीबी घेऊन फरार झाले आहेत.
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खैरदरा परिसरात वाळूची अवैध चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांना मिळाली. त्यानुसार पोलीस नाईक अनिल कडलग, पोलीस कॉन्स्टेबल बापूसाहेब हांडे हे दुचाकीवरून खैरदरा येथे गेले.
माहिती घेत असताना त्यांना एका शेतात वाळूच्या साठ्यासह एक ट्रक व एक डंपर दिसून आला. पथक खाजगी वाहनाने जांबूत-मोरेवाडी रस्त्याने जात असताना त्यांना एक डंपर जेसीबीच्या सहाय्याने व दुसरा ट्रक मजुरांच्या सहाय्याने वाळू भरताना दिसून आला. पोलिसांचे पथक त्यांच्या दिशेने येत असल्याची चाहूल लागताच जेसीबी चालकाने अंधाराचा फायदा घेत जेसीबी पळवला. चौकशी दरम्यान वाळू वाहतुकीचा कोणताही शासकीय परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलीस पथकाने ३ ब्रास वाळूसह डंपर (क्रमांक एम. एच. -१७, बी. डी. ६८५५) व ट्रक (क्रमांक एम. एच. १२ एफ. सी. ७२५४ ) असा एकूण ९ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.