आरटीओने ठोठावला सहा लाखांचा दंड! श्रीरामपुरात कारवाई, खासगी बसेसची महिनाभर तपासणी
By शिवाजी पवार | Published: July 19, 2023 02:23 PM2023-07-19T14:23:37+5:302023-07-19T14:23:55+5:30
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबवलेल्या वाहन तपासणी अभियानात १४० वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून ...
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने राबवलेल्या वाहन तपासणी अभियानात १४० वाहने दोषी आढळून आली. त्यांच्याकडून सहा लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गावर घडलेल्या खासगी बसच्या अपघातामुळे परिवहन विभागाने १ ते ३१ जुलै दरम्यान प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. यात ३५० बसेसची तपासणी करण्यात आली.
दारू पिऊन वाहन चालवणे, अमर्याद वेग, अग्निशमन प्रणालीचीचा अभाव, विना परवाना वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे, बेकायदा वस्तूंची वाहतूक, वाहनांमध्ये बेकायदा केलेली दुरुस्ती अशा कारणास्तव दंड ठोठावण्यात आला.
याबरोबरच आपत्कालीन दरवाजांची स्थिती, फिटनेस प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, टेल लाईट आदी तपासण्या मोटर वाहन कायद्यानुसार करण्यात आल्या. खाजगी बसेसची तपासणी अभियान सुरूच राहणार आहे. वाहन चालकांना नियमांचे पालन करावे लागेल. त्याचबरोबर प्रवाशांना बसेसमध्ये चुकीच्या गोष्टी आढळून आल्या तर त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी केले आहे.