संगमनेरात होणार आता आरटीपीसीआर चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:18 AM2021-04-12T04:18:32+5:302021-04-12T04:18:32+5:30
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांच्या घशातील स्राव नमुने घेत तपासणीकरिता ते जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत ...
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत कोरोनाची लक्षणे जाणवणाऱ्या रुग्णांच्या घशातील स्राव नमुने घेत तपासणीकरिता ते जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेत पाठविले जातात. परंतु कोरोना संक्रमणाचा वेग आणि दररोज मोठ्या संख्येने समोर येणारे संशयित यांमुळे शासकीय प्रयोगशाळेतील यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला. त्यातून जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील अहवाल प्रलंबित राहू लागल्याने त्या दरम्यान उपचारांची गरज असलेल्या रुग्णांची परवड होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता आहे.
आरटीपीसीआर चाचणी होत असलेले राज्यातील तालुकास्तरावरील पहिले शासकीय केंद्र संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयातील विशेष कोविड-१९ आरोग्य केंद्रात शनिवार (दि. १०)पासून सुरू करण्यात आले आहे. तत्काळ उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी हे मशीन अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. ग्रामीण रुग्णालयातील प्रमोद मैड यांच्यावर आरटीपीसीआर चाचण्या करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, दररोज ७० ते ८० चाचण्या या मशीनद्वारे होऊ शकतील.
-----------
रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आरटीपीआर मशीनमध्ये संशयिताच्या घशातील स्राव तपासला जाणार आहे. या मशीनद्वारे पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल अवघ्या चार मिनिटांत, तर निगेटिव्ह व्यक्तीचा अहवाल सतरा मिनिटांत मिळतो. एका तासात पाच ते सहा आणि दिवसभरात ७० ते ८० चाचण्या या मशीनद्वारे होऊ शकतात. त्यामुळे चाचण्यांचा वेगही वाढणार आहे.
- डॉ. संदीप कचेरिया, वैद्यकीय अधिकारी, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय, संगमनेर