रानडुकरांचा उपद्रव : भुईमुगाचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 05:24 PM2018-08-07T17:24:09+5:302018-08-07T17:24:22+5:30
हवामानाच्या बदलाबरोबरच शेतकऱ्यांना रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतक री हैराण झाले आहेत.
राहुरी : हवामानाच्या बदलाबरोबरच शेतकऱ्यांना रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतक री हैराण झाले आहेत. खडांबे, सडे, वांबोरी, कुक्कडवेढे आदी गावांच्या परिसरात रानडुकरांनी हैदोस घातल्याने भूईमुगाचे क्षेत्र झपाट्याने घटले आहे.
राहुरी तालुक्यात डुकरांचे कळप वाढले आहेत. शेतक-यांनी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. शेताच्या कडेला तार लावून रानडुकरांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी देखील डुकरांचा उपद्रव थांबलेला नाही. डोक्याचे केसही शेतक-यांनी शेतात टाकून पाहिले़ तरी देखील रानडुकरांकडून नुकसान करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. एकरी २० हजार रूपये खर्च केल्यानंतर ५० हजार रूपये उत्पन्न मिळते. याशिवाय शेंगाला आलेल्या पाल्याचाही उपयोग जनावरांच्या चा-याच्या माध्यमातून होतो. ऊस, घास, मका आदी पिकांचे रानडुकरे नुकसान करीत आहेत. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. शेतमालाचा रानडुकरांपासून कसा बचाव करावा याचे मार्गदर्शन करण्याची गरज शेतक-यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही शेतक-यांनी रात्र जागून काढली, मात्र रानडुकरांचा बंदोबस्त होऊ शकलेला नाही.
रानडुकरांचा बंदोबस्त करावा म्हणून वन खात्याकडे शेतक-यांनी तक्रार केली होती. मात्र रानडुक्कर हे वन्य प्राणी कक्षेत येत नसल्याचे उत्तर देण्यात आले. त्यामुळे वन खात्याकडे दाद मागण्याचा नाद शेतक-यांनी सोडून दिला. जमिनीत तोंड खुपसून भुईमूग, चारा पिके, ऊस यांचे डुकरे नुकसान करीत आहेत. डुकरांची संख्या वाढल्याने शेतक-यांवर जमीन पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. बंदोबस्तासाठी सर्व उपाय अयशस्वी ठरले आहेत. पर्यायाने पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. -विठ्ठल कारले, शेतकरी, खडांबे खुर्द, ता. राहुरी.
फॉरेस्टच्या कडेला शेतक-यांची जमीन असेल तर सोलर कंपौंडसाठी अनुदान दिले जाते. रानडुकर वन कायद्यात असल्याने नुकसान भरपाई दिली जाते. सुळ्यावाले डुकरे असले तर भरपाई दिली जाते. गाव डुकरे आहेत की रानडुकरे याची पाहणी करून शहानीशा केली जाईल. -महादेव पोकळे, वनक्षेत्रपाल, राहुरी.