मंदिरे फोडणारी टोळी गजाआड : राहुरी पोलिसांची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 01:06 PM2019-07-07T13:06:10+5:302019-07-07T13:06:53+5:30
राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले.
ब्राह्मणी/वांबोरी : राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, मानोरी व उंबरे येथील देवींची मंदिरे फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात राहुरी पोलिसांना अखेर साडेतीन महिन्यानंतर यश आले.
सदर मंदिरे फोडण्याची घटना १५ मे च्या रोजी घडली होती. घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी राहुरी पोलीस नगर-मनमाड महामार्गावर गस्त घालताना एका संशयीत टोळीचा पाठलाग करून एक जण पकडला होता. त्याची चौकशी केली असता आकाश ज्ञानदेव पवार (रा.देहरे) असे नाव त्याने सांगितले. पोलिसांनी विश्वासात घेऊन तपास केला असता सदर गुन्हा संदीप बबन बर्डे, सचिन माळी, संदीप मोहन गांगुर्डे, शंकर बर्डे सर्व (रा.देहरे), रमेश माळी (रा.मानोरी) यांनी केल्याची कबुली आकाश पवार याने दिली. त्यांनी ब्राह्मणी, उंबरे, मानोरीसह देवळाली प्रवरा व एमआयडीसी हद्दीतील मंदिरांची चोरी केल्याचे चौकशीत उघड झाले. तपासादरम्यान संदीप बर्डे यास अटक करण्यात आली. मंदिर चोरीतील मुद्देमाल हा सुजित नवनाथ पवार (रा.खडांबे खुर्द) याच्याकडे ठेवला असल्याचे बर्डे याने सांगितले. दरम्यान सुजित पवार याच्यासह देवीची नथ, मुकुट व चांदीचे दागिने आदी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. सदर तपास जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, तपासी अधिकारी सतीष शिरसाठ, पोलीस कर्मचारी शैलेश सरोदे, पथवे ,कोळगे, रवींद्र मेढे, सुनील शिंदे यांनी केला.
आणखी चार जणांचा शोध सुरू
सदर चोरीच्या गुन्ह्यातील चार जण अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध राहुरी पोलिसांकडून सुरू आहे. एमआयडीसी परिसरातील मंदिर फोडल्याच्या आणखी घटना उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती राहुरी पोलीस स्टेशनचे फौजदार सतीश शिरसाठ यांनी दिली.