ग्रामीण अर्थकारणाचे अध्वर्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 03:38 PM2019-08-19T15:38:13+5:302019-08-19T15:38:24+5:30
शेती व शेतकरी या प्रश्नांवर कधीही तडजोड करायची नाही, हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य़ कृषी कर्जाचे व्याजदर कमी करण्यासाठी रिझर्व बँकेवर काढलेला मोर्चा, खंडकरी शेतकºयांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात, यासाठी केलेलं आंदोलन व त्यातून झालेला कारावास, शेतमालास रास्त भावासाठी आंदोलन, पाणी प्रश्नासाठी अखंड चळवळ राबवून शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा दिली़
अहमदनगर : शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव कोल्हे यांचे चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण येसगाव येथेच झाले़ पुढील शिक्षणासाठी ते कोपरगावला आले़ कोपरगावमध्ये काही शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे गाठले़ पुण्यात माध्यमिक, पदवीचे शिक्षण पूर्ण केले़ बीएस्सी अॅग्रीची पदवी मिळविल्यानंतर त्यांनी शेतीचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला़ त्याचवेळी सरकारने भारतातून शेती प्रशिक्षणासाठी २५ विद्यार्थी पाठविण्याचा निर्णय घेतला होता़ त्यात शंकरराव कोल्हे यांची निवड झाली अन् वयाच्या २४ व्या वर्षी ते अमेरिकेत दाखल झाले़ तेथील शेती आणि भारतातील शेती, जनजीवन यांची ते तुलना करु लागले़ अमेरिकेतील प्रगती आणि भारतातील मागासलेपण पाहून त्यांना नेहमी खंत वाटायची़ अमेरिकेहून परत येताना त्यांनी शेतीत नावीन्यपूर्ण कल्पना आणि शेतकºयांचे जीवन सुखी करण्यासाठी काम करण्याचा संकल्पच सोडला होता़ अज्ञानी, पिचलेल्या शेतकºयांना सज्ञान करायचे, वेगवेगळ्या संस्था उभ्या करुन ग्रामीण अर्थकारणाला झळाळी देण्याची प्रेरणा त्यांनी याच अमेरिका दौºयातून घेतली़
शंकरराव यांचे वडील गेणूजी हे अशिक्षित होते़ मात्र, त्यांनी आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावे, यासाठी काबाडकष्ट उपसले़ आपल्या वडिलांचे कष्ट पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या शंकरराव कोल्हे यांनी कोपरगावात परतल्यानंतर शेती सुधारण्याचा निर्णय घेतला़ त्यासाठी त्यांनी खंडकरी शेतकºयांची चळवळ उभी केली़ मात्र, तत्पूर्वीच त्यांना येसगावचे सरपंच होण्याचा बहुमान १९५० साली मिळाला होता़ त्यावेळी त्यांचे वय होते अवघे २१़ कोपरगाव तालुका व परिसरात त्यावेळी खासगी कारखान्यांचे जाळे होते़ त्यामुळे शेतकºयांचाही सहकारी साखर कारखाना असावा, अशी त्यांची इच्छा होती़ त्यामुळे शंकरराव कोल्हे यांच्यासह त्यांच्या तत्कालीन मित्रांनी १९५६ साली कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली़ १९५९ साली कोल्हे यांना वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी कारखान्याचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली़ त्यातून त्यांनी परिसरातील शेतकºयांना ऊस लागवडीचे तंत्र, अधिक उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले़ त्यानंतर अवघ्या १ वर्षातच म्हणजे १९६० साली त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती केली़ पुढे त्यांनी महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, नॅशनल हेवी इंजिनिअरिंग, नॅशनल को-आॅपरेटीव्ह फेडरेशन, अशा अनेक शासकीय-अशासकीय संस्थांवर महत्वाच्या पदांवर काम केले़
कर्मवीर भाऊराव पाटलांचाही कोल्हे यांच्यावर प्रभाव होता़ त्यातून प्रेरणा घेत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोठे काम हाती घेतले़ शिक्षणशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन येणार नाही़ प्रगतीशील विचार येणार नाही. दु:ख आणि दारिद्र्य संपविण्याचा तो एकमेव मार्ग आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता़ म्हणूनच त्यांनी १९७८ साली संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल सुरु केले़ आपल्या भागातील मुलांना पारंपरिक शिक्षणासह अभियांत्रिकीचेही शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी १९८३ साली संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून शेतकरी कुटुंबातील मुलांना अभियंता बनविले. सैनिकी स्कूलची स्थापना करून कित्येक मुलांना त्यांनी देशाची सुरक्षा करण्यासाठी दारे उघडी करून दिली.
शेतीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुटीचे खोरे असलेल्या गोदावरी खोºयात घाट माथ्यावरील समुद्राला मिळणारे पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे वळविणे, हाच पर्याय आहे, अशी त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली़ पाणी प्रश्नावर शासनाच्या चितळे आयोगासमोरही त्यांनी अभ्यासू मुद्दे मांडले़ त्यांची नोंद घेतल्याचेही अहवालात नमूद केले. गोदावरी खोºयातील हक्काचे पाणी कमी झाल्यामुळे पर्यायी पाणी उपलब्धतता अनिवार्य आहे, हे ओळखून १९८८ ला गोदावरी नदीवर पहिला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा त्यांनी निर्माण केला़ अशा प्रकारचे बंधारे गोदावरीसारख्या नदीवर बांधणे ही संकल्पना तोपर्यंत सरकारनेही स्वीकारली नव्हती़ तो प्रयोग यशस्वी झाल्यावर सडे, मंजूर येथेही बंधारे बांधले़ त्यांचे अवलोकन करीत पुढे इतरत्रही असे बंधारे बांधण्यात आले़ सन २००५ चा समन्यायी पाणी वाटपाचा कायदा उर्ध्व गोदावरी खोºयावर अन्याय आहे, असे सांगत शासन दरबारी सर्वप्रथम प्रश्न उपस्थित करीत न्यायालयाचे दरवाजे ठोठावले़ १९९४ ला भारताने गॅटकरार स्वीकारल्यानंतर त्यातील काही तरतुदी शेतकºयांसाठी खूपच हानिकारक आहेत, यावर आवाज उठविण्यासाठी इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन अॅग्रीकल्चर नावाचे व्यासपीठ स्थापन करुन करारावर प्रभावी मुद्दे माडले. सहकार, शेती, साखर कारखानदारी, जैवतंत्रज्ञान यासह विविध विषयांच्या अभ्यासासाठी त्यांनी १७ वेळा परदेश दौरे केले़ आर्यभूषण, सहकार रत्न, गिरणा गौरव पुरस्कार, आदर्श रयत सेवक पुरस्कार, शिवाजीराव नागवडे राज्यस्तरीय आदर्श सहकार पुरस्कार, शंकरराव कोल्हे यांनी लिहिलेल्या ‘सत्याग्रही शेतकरी पुस्तकास’ आचार्य अत्रे पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार, मराठा सन्मान पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी कोल्हे यांना गौरविण्यात आले आहे़
अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी करुन त्यांनी गावखेड्यांमधील विद्यार्थ्यांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ दिले़ गरीब विद्यार्थ्यांप्रति त्यांना विशेष प्रेम असायचे़ त्याचे एक छोटे उदाहरण असे- एका गरीब विधवा महिलेच्या मुलीला बारावीला प्रवेश घ्यायचा होता़ तिची परिस्थिती अत्यंत नाजूक होती़ म्हणून मी तिला घेऊन साहेबांकडे गेलो़ मी त्यांचा निष्ठावंत असल्यामुळे साहेब आपले ऐकतील असा विश्वास होता़ परंतु साहेबांनी शुल्क भरले तरच प्रवेश मिळेल, असे सांगितले़ त्यामुळे मी तेथून रागानेच बाहेर पडलो़ त्यावर काही वेळाने त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना बोलावून घेतले आणि सर्व गरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्क माफ करण्यास सांगितले़ सर्वांचे मिळून सुमारे १२ लाख रुपये साहेबांनी काही क्षणात माफ केले़ असा नेता लाभणे हे कार्यकर्त्यांचे भाग्यच़ ते भाग्य मला लाभले़
मच्छिंद्र टेके (माजी सभापती, कोपरगाव पंचायत समिती)