नागरिकांकडून नियम पायदळी, तर व्यापाऱ्यांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:20 AM2021-04-07T04:20:44+5:302021-04-07T04:20:44+5:30
कोणती दुकाने सुरू राहतील व कोणती बंद राहतील याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, रिकामटेकडे लोक इकडे तिकडे ...
कोणती दुकाने सुरू राहतील व कोणती बंद राहतील याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. दरम्यान, रिकामटेकडे लोक इकडे तिकडे फिरत लॉकडाऊनच्या काळातील नियम पायदळी तुडवीत असल्याचे दिसून येत होते.
मंगळवारी केवळ बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने उघडी होती. अन्य व्यापारी दुकाने बंद ठेवून लॉकडाऊनबाबत चर्चा करताना दिसून आले. अगोदर सरकारने कडक निर्बंध लावण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. मग अचानक लॉकडाऊन कसा लावला, यावर चर्चा रंगल्या होत्या. जवळपास सर्वच दुकाने बंद असतानादेखील रिकामटेकडे चौकाचौकांत घोळक्याने बसल्याचे दिसून येत होते. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे त्यांच्याकडून सर्रासपणे उल्लंघन केले जात होते. लॉकडाऊनबाबत व्यापारी, दुकानदारांमध्ये नाराजीचा सूर दिसत होता.
दरम्यान, मोटारसायकल, चारचाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन केले जात होते. एकाच दुचाकीवरून तिघे-तिघे, तर चारचाकी वाहनातून प्रवासी क्षमतेपेक्षा अधिक लोक प्रवास करताना आढळून आले. त्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून कारवाई होताना दिसून आली नाही. सरकारी, निमसरकारी तसेच सहकारी कार्यालयांत, बँकेत, पतसंस्थांमध्ये तुरळक नागरिक कामानिमित्ताने आल्याचे दिसून येत होते.
..........
५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कोरोनाग्रस्त.
नगर परिषद, पोलीस ठाणे, महसूल यांसह विविध खात्यांतील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखतानाही अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीचा परिणाम होत आहे.