‘त्या’ अफवेने ब्राह्मणीकरांची धाकधूक कायम; अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:06 PM2020-07-11T12:06:52+5:302020-07-11T12:07:29+5:30
गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या सोशल मिडियावरील अफवांनी ब्राह्मणीकरांची दोन दिवसांपासून धाकधूक कायम आहे. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यामुळे गावात फिरणारे भितीने घरीच थांबून आहेत.
ब्राह्मणी : गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या सोशल मिडियावरील अफवांनी ब्राह्मणीकरांची दोन दिवसांपासून धाकधूक कायम आहे. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यामुळे गावात फिरणारे भितीने घरीच थांबून आहेत. तर संपर्कातील व्यक्तींनी चांगलाच धसका घेतला आहे. तीन दिवस झाले तरी अजून अहवाल आला नाही.
गुरुवारी (दि.९ जुलै) ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन केंद्रातून आजारी असलेल्या रुग्णास राहुरी कृषी विद्यापीठ कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. अधिकृत अहवाल प्राप्त नसताना शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल झाल्याने अनेकांना धक्काच बसला.
दरम्यान, नागरिकांची एकच धांदल उडाली. याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांना संपर्क केला असता अद्याप अहवाल आला नाही. अफवांवर विश्वास ठेवून घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे ब्राह्मणीतील जनतेला दिलासा मिळाला.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नातेवाईकांनी फोनवर ब्राह्मणीतील आपल्या नातेवाईकांकडे सोशल मीडियावरील संदेशाबाबत विचारणा केली. दिवसभर प्रत्येकाचा फोन खनखणले. त्यामुळे विनाकारण सगळ्यांचीच डोकेदुखी झाली. कोरोना पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी कोरोना दक्षता समितीने महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ब्राह्मणीत बसस्थानकावर पुन्हा चेक पोस्ट करून गावात येणारे व जाणारे व्यक्तींची तपासणी होईल. सोनई हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्याने १३ दिवस सोनईत न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. गत दोन तीन दिवसात सोनईवरून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून होमक्वारंटाईन व्हावे असे आहवान करण्यात आले.
लग्न, अंत्यविधी, दहावा, तेरावा, वाढदिवस, कंदोरी आदी कार्यक्रम टाळावे. आयोजकांनी गर्दी जमविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाई होईल. सदर कार्यक्रमांना शक्यतो परवानगीच घ्यावी. मास्क न वापरणारे व बाजारतळावर गर्दी करणारºयांना व्यक्तींवर होणार कारवाई होईल. जिल्ह्याच्या बाहेरील पाहुणे गावात बोलावून त्यांना मुक्कामी ठेवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा सबधितास जबाबदार धरण्यात येईल. अशा सूचना भोग्याद्वारे यावेळी देण्यात आली.
अहवाल प्राप्त होताच आवश्यकता असल्यास पुन्हा ब्राह्मणीत लॉकडाऊन वाढविण्यात येईल. आजारी रुग्णास गुरुवारी राहुरी विद्यापीठ कोवीड सेंटरमध्ये दाखल केले. दरम्यान त्याचे स्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अहवाल प्राप्त झाला नव्हता. दिवसभर अहवालाची वाट पाहणाºया ब्राह्मणीकरांचे फोन खात्री करण्यासाठी एकमेकांना सुरूच होते. सर्वांच्या नजरा आजही (शनिवारच्या) अहवालाकडे लागून आहेत.