नगरचे पाणी बीड पळविणार ही अफवा-पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:08 PM2019-10-12T17:08:59+5:302019-10-12T17:10:30+5:30
राज्यात येत्या २४ तारखेला रात्रीच्या १२ वाजून १२ मिनीटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. ३७० हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच नगरचे पाणी बीडला पळविणार या अफवेचा त्यांनी समाचार घेतला.
पांढरीपूल : राज्यात येत्या २४ तारखेला रात्रीच्या १२ वाजून १२ मिनीटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे. ३७० हा आमच्या प्रचाराचा नव्हे तर आमच्या स्वाभिमानाचा व संस्काराचा मुद्दा आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच नगरचे पाणी बीडला पळविणार या अफवेचा त्यांनी समाचार घेतला.
राहुरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले, नेवासा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ शनिवारी पांढरी पूल येथे झालेल्या जाहीर सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी डॉ सुजय विखे उपस्थित होते. मुंडे पुढे म्हणाल्या, नगरच्या मुळाचे पाणी बीडमध्ये जाणार अशी अफवा सध्या जोरात सुरू आहे. आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका. आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादीवाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे. आम्ही एक एक आमदार विजयी व्हावा यासाठी स्वत:चे मतदारसंघ सोडून राज्यभर फिरत आहोत. युती सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच धनगर समाजाला न्याय देण्याचा निर्णय घेतला. जातीपातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे, असेही मुंडे म्हणाल्या.