चार ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 05:05 PM2019-04-14T17:05:47+5:302019-04-14T17:07:01+5:30
आरोग्य विभागाच्या सरकारी वैद्यकीय यंत्रणाच अपुरी असल्याने ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला आहे.
हेमंत आवारी
अकोले : आरोग्य विभागाच्या सरकारी वैद्यकीय यंत्रणाच अपुरी असल्याने ग्रामीण रुग्णालयांचा श्वास गुदमरला आहे. अकोले, राजूर, समशेरपूर, कोतूळ या चार ग्रामीण रुग्णालयांतील मंजूर १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी चक्क १२ पदे रिक्त आहे. यामुळे तालुक्यातील सरकारी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
खाजगी सुसज्ज हॉस्पिटल नसल्याने अकोलेकरांना संगमनेर, धामणवन, नाशिक, लोणी येथील आरोग्य सुविधेवर अवलंबून रहावे लागत आहे. अकोले ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१ वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद भरलेले आहे. श्रेणी -२ चे मंजूर तीन पैकी दोन वैद्यकीय अधिकारी पद भरलेले आहे. अस्थायी स्वरुपाचे भरलेले एक वैद्यकीय अधिकारीपद नऊ महिन्यांनी रिक्त होणार आहे. दोन लिपिक पदे, पर्यवेक्षिका दोन पदे, स्वीपर दोन पदे, शिपाई पद व नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या कंत्राटी दोन्ही पर्यवेक्षिका पदे रिक्त आहे.
जिल्ह्यात दोन कुपोषण मुक्तीसाठीचे विशेष पोषण आहार युनिट आहे. पैकी एक अकोले ग्रामीण रुग्णालयात आहे. यातील वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, स्वयंपाकी, शिपाई, पर्यवेक्षिका सर्व पदे रिक्त असून केवळ एक पर्यवेक्षिका पद भरलेले आहे. एक पर्यवेक्षिका हा कुपोषणाचा सर्व विभाग सांभाळत आहे. मध्यंतरी दोन वर्षे हे एनआरसी युनिट नगरला हलविण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी २०१६-१७ ला हे युनिट पुन्हा अकोलेला आले पण सात पदे रिक्त आहेत.
समशेरपूर ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१ वैद्यकीय अधिकारीपद रिक्त असून व श्रेणी-२ चे मंजूर तीन पैकी एक वैद्यकीय अधिकारी पद भरलेले आहे. एक बंदपत्रीत वैद्यकीय अधिकारी असून हे पद दोन महिन्यांनी रिक्त होणार आहे.
राजूर ग्रामीण रुग्णालयात श्रेणी-१चे एक व श्रेणी-२चे तीन पदे मंजूर असून ही चारही पदे रिक्त आहेत. सध्या अकोलेतून दोन वैद्यकीय अधिकारी आळीपाळीने येथील आरोग्य सेवा सांभाळत आहे. हीच स्थिती कोतूळ ग्रामीण रुग्णालयाची असून चारही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. येथे जामखेडहून सेवा वर्ग असलेले वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. एक बंदपत्रीत वैद्यकीय अधिकारीपद २० एप्रिलला रिक्त होणार आहे.
रिक्तपदांमुळे तालुक्यातील चारही ग्रामीण रुग्णालायांच्या प्रशासनावर प्रंचड ताणतणाव आहे. निवडणक प्रशिक्षणासाठी एक वैद्यकीय युनिट निवडणूक प्रशासनाने मागितले होते. पण ही सुविधा आरोग्य विभाग देऊ शकले नाही. राज्यात अदमासे अडीच हजार वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असून मध्यंतरी ८९० वैद्यकीय अधिकारी भरण्यासाठीची सुरुवात झाली होती, पण प्रशासनाच घोडं कुठे आडले? हे कळले नाही.
अकोले तालुक्यात ३१ पदे रिक्त
अकोले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी मंजूर २७ पदांपैकी मवेशी, लाडगाव, देवठाण, घाटघर, शेंडी, घाटघर भरारी पथक व ब्राम्हणवाडा असे ७ पदे रिक्त आहेत. आरोग्य सहायक ३,आरोग्य सेवक ५,आरोग्य सेविका २, वाहन चालक १०, परिचर ४, प्रयोगशाळातंत्रज्ञ २, सफाई कामगार ५ असे एकूण ३१ पदे रिक्त आहेत.