सचिन तेंडूलकर यांचे कुटुंबीयांसमवेत शिर्डीत साईदर्शन; दर्शनानंतर क्रिकेटप्रेमींचा सचिन..सचिनचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:18 PM2020-01-13T17:18:18+5:302020-01-13T17:19:02+5:30
भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला.
शिर्डी : भारतरत्न व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सचिन तेंडूलकर यांच्या उपस्थितीने अवघा साईदरबार सोमवारी भारावून गेला. तेंडूलकर कुटुंबीयांनी साईदर्शन घेतले. यावेळी साईदरबारी प्रथमच सचिन..सचिनचा... जयघोष ऐकायला मिळाला.
क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडूलकर यांनी सोमवारी पत्नी डॉ़अंजली, मुलगा अर्जुन व भाऊ अजित यांच्यासह साई दरबारी हजेरी लावली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांनी सचिन यांच्या नावाचा जयघोष केला. मंदिरात मात्र भाविकांनी साईनामाचा जयघोष केला. सचिन यांच्या हस्ते समाधीवर शाल अर्पण करण्यात आली. समाधीवरील सुवर्ण पादुकांवर अभिषेक करण्यात आला. अंजली यांनी साईमूर्ती समोरील दानपेटीत दक्षिणा अर्पण केली.
दर्शनानंतर सचिन यांनी आज बाबांच्या दर्शनाने खुप समाधान मिळाल्याची भावना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे व्यक्त केली. तत्पूर्वी संस्थानच्या वतीने मुगळीकर तसेच शिर्डीकरांच्या वतीने नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी तेंडुलकर कुटूंबाचा सत्कार केला. यावेळी जयश्री मुगळीकर, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, सुनील गोंदकर, सुजीत गोंदकर, मंदिर पर्यवेक्षक शिवाजीराव गोंदकर यांची उपस्थिती होती.
चार्टर विमानाने सचिन साईबाबा विमानतळावर उतरले. तेथून ते कारने मंदिर परिसराच्या बाहेर येताच चाहत्यांनी त्यांच्या गाडीला गराडा घातला. सुरक्षा रक्षकांनी कडे करून संपूर्ण तेंडूलकर परिवाराला मंदिर परिसरात आणले. यावेळी मंदिर परिसरातही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. मंदिरात तर सर्व नियम धाब्यावर बसवून स्थानिकांनी व भाविकांनी एकच गर्दी केली होती.