कोरोना सेंटरमध्ये यज्ञ करणे ही अंधश्रद्धा नव्हे श्रद्धाच- सुजित झावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 02:03 PM2021-05-24T14:03:20+5:302021-05-24T14:04:18+5:30
अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कुणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
अहमदनगर : कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करणे ही अंधश्रद्धा नसून, तो एक श्रद्धेचा भाग आहे. या महायज्ञाचा कुणी चुकीचा अर्थ काढून आमच्या श्रद्धेला हात घालू नये, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पारनेर तालुक्यातील वसंतराव झावरे पाटील कोविड केअर सेंटरमध्ये महायज्ञ करण्यात आला. अंनिसने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सुजित झावरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. झावरे म्हणाले की, कोरोनावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचे औषध सापडलेले नाही. जे चालू आहे ते अंदाजे चालू आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड देणे देऊन जर कोरोना रुग्णांना समाधान मिळत असेल तर यज्ञ करण्यात काही गैर नाही. परमेश्वरावर श्रद्धा ठेवूनच हा यज्ञ करण्यात आला होता. गाईच्या दुधापासून बनविलेले तूप व गोवरी जाळल्यामुळे त्यातून ऑक्सिजनच बाहेर पडतो, हे विज्ञान सांगते. मी सांगत नाही. हा दृष्टिकोन समोर ठेवून महायज्ञ केला. त्यामुळे कोरोना रुग्णांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला. आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे, अशी भावना या रुग्णांमध्ये निर्माण झाली, असे असताना अंनिसने जिल्हाधिकाऱ्यांकडे महायज्ञबाबत तक्रार केलेली आहे. इतर सेंटरमध्ये प्रवचने, वेगवेगळे कार्यक्रम होतात, याबाबत मात्र कुणीच का बोलत नाही. आम्ही यज्ञ केल्यामुळे नंतर मात्र कारवाईची मागणी होते. मग अशा सेंटरबाबत अंनिस गप्प का आहे ? असा सवाल उपस्थित करत यामागे काहीतरी राजकीय षड्यंत्र आहे, असा आरोपही झावरे यांनी यावेळी बोलताना केला.