सर्वसामान्यांचे कैवारी सदाअण्णा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:27 AM2021-02-27T04:27:44+5:302021-02-27T04:27:44+5:30
सदाअण्णा पाचपुते यांचा सहवास आम्हाला साधारणपणे १९९९ पासून लाभला. माजी मंत्री बबनराव (दादा) पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व सदाअण्णा यांच्या ...
सदाअण्णा पाचपुते यांचा सहवास आम्हाला साधारणपणे १९९९ पासून लाभला. माजी मंत्री बबनराव (दादा) पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली व सदाअण्णा यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना काम करण्याची संधी मिळाली. अण्णांनी आम्हास घडविले, वाढविले.
एका सर्वसामान्य कुटुंबातील यादव साहेबांसारख्या व्यक्तीस त्यांनी ॲग्री ओव्हरशिअरचे शेतकी अधिकारी, दादांचे स्वीय सहायक, कारखान्याच्या जनरल मॅनेजर पदाची संधी दिली. माझ्यासारख्या छोट्या कुटुंबातील व्यक्तीला क्लार्कपासून कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी, एका मोठ्या गावाच्या सरपंचपदाची संधी दिली. लोणीसारख्या मोठ्या गावातील व्यक्तीस शुगर क्लार्क ते बाजार समिती संचालक, जि. प. उमेदवारी व साखर विक्री अधिकारी केले. येळपणेसारख्या गावातील एका मुलाला शिपाई ते कारखान्याचे शेतकी अधिकारी व सोसायटीचे अध्यक्ष बनविले.
काकडे कुटुंबातील गणेश काकडेसारख्या मुलाला अकाउंटंट, क्लार्क ते कारखान्याचे चीफ अकाउंटंट बनविले. अण्णांनी बेलवंडी येथील खेडकर कुटुंबातील मुलाला शिपाई ते कॉम्प्युटर इन्चार्ज केले. लिंपणगाव येथील उच्चशिक्षित बडवे गुरुजींच्या मुलाला कारखान्याचे इंजिनिअर ते चीफ इंजिनिअर व आता वर्क्स मॅनेजर बनविले. घारगाव येथील संदीप जाधव यांना केमिस्ट ते चीफ केमिस्ट पदावर काम करण्याची संधी दिली, अशा असंख्य कुटुंबातील व्यक्तींना कामाची संधी दिली. हे फक्त अण्णाच करू शकले.
एवढ्यावरच अण्णां थांबले नाहीत. त्यांनी राजकारणामध्येही असंख्य कार्यकर्ते घडविले. गावच्या सरपंचपदापासून बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी संस्थांमध्ये अनेकांना मोठ-मोठी पदे दिली. त्यांनी सुदर्शन, साजन या त्यांच्या मुलांप्रमाणेच विक्रमसिंह, प्रतापसिंह, अजय या पुतण्यांनाही घडविले. समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना ताकद, न्याय देण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी आयुष्य व्यक्तिगत जीवनापेक्षा समाजासाठी वेचले.
तरीही देवाने आमच्या सर्वसामान्यांचा आधार हिरावला. त्यांचे विचार आचरणात आणून सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांची सेवा करण्याचा संकल्प आम्ही करतो. हीच अण्णांना भावपूर्ण आदरांजली.
- संतोष गुंड,
जनसंपर्क अधिकारी,
साजन शुगर प्रा. लि.