रस्त्याच्या दुतर्फा भगवे ध्वज, पोवाड्यांनी शिवजंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:58 AM2021-02-20T04:58:14+5:302021-02-20T04:58:14+5:30
शेवगाव : शाहिरांचे स्फूर्तिदायी पोवाडे, रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे ध्वज, उभारलेल्या स्वागत कमानी, जय जिजाऊ, जय शिवराय अशा ...
शेवगाव : शाहिरांचे स्फूर्तिदायी पोवाडे, रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे ध्वज, उभारलेल्या स्वागत कमानी, जय
जिजाऊ, जय शिवराय अशा घोषणांच्या गजरात तालुक्यात ठीकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शहरातील आखेगाव रस्ता येथून फुलांनी आकर्षक सजविलेल्या वाहनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची टाळ मृदंगाच्या गजरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. आखेगाव रस्ता, संत गाडगेबाबा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे क्रांती चौकात आल्यावर राम महाराज झिंजुरके यांच्या हस्ते शिवरायांची आरती करण्यात आली. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी, शिवभक्त सहभागी झाले होते.
शिवजयंती निमित्त गुरुवारी सायंकाळी शहरातील बाजारपेठेत तसेच विविध मार्गावर भगवे ध्वज लावण्यात आले होते. याच बरोबर स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या. तालुक्यातील विविध गावात चौकाचौकात आकर्षक सजविलेल्या मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, मूर्ती ठेऊन शिवजयंती साजरी करण्यात आली. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे विजय देशमुख, उमेश भालसिंग, तुषार लांडे, राहुल देशमुख, संजय कोळगे, महेश शेटे, नंदकुमार मुंढे, कुलदीप फडके, राजाभाऊ झरेकर, मुन्ना बोरुडे, सचिन लांडे, रवी जाधव, माऊली खबाले, भूषण देशमुख, सुनील काकडे, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगडे, दत्ता फुंदे, शरद जोशी, नीरज लांडे, सनी देशमुख, जगदीश आरेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला.
----
१९ शेवगाव जयंती