जखमेवर मलमपट्टी नव्हे़, गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालणार-सागर पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 01:26 PM2020-01-05T13:26:57+5:302020-01-05T13:28:26+5:30
नगर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़सागर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
संडे स्पेशल मुलाखत / अरुण वाघमोडे ।
भौगोलिकदृष्ट्या नगर जिल्हा जसा विस्ताराने मोठा आहे. तसे गुन्हेगारीचे प्रमाणही येथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेला भयमुक्त वातावरण देण्यासाठी येणा-या काळात पोलिसांची भूमिका केवळ मलमपट्टीची राहणार नाही तर गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालून ती समूळ नष्ट करणार असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ़सागर पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मनुष्यबळ पुरेसे आहे का ?
जिल्ह्याचा विस्तार आणि लोकसंख्येच्या तुलनेत येथे मनुष्यबळाची कमतरता आहे़ जिल्ह्यात नव्याने बारा पोलीस स्टेशन आणि पोलीस दूरक्षेत्र व्हावेत, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेले आहेत. हे काम तातडीने मार्गी लागावे, यासाठी पाठपुरावाही सुरू आहे. सध्या उपलब्ध आहे ते मनुष्यबळ आणि यंत्रणेच्या माध्यमातून येत्या वर्षभरातील कामाचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने सराईत गुन्हेगारांना पोलीस लक्ष्य करणार आहेत़.
गुन्हेगारी नियंत्रणावर उपाययोजना काय आहेत?
मागील वर्षात १७ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई केली. एमपीडीएची सर्वाधिक कारवाई करणारा राज्यात नगर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. एमपीडीएसह मोक्का कायद्यातंर्गतही कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार आणि नव्याने गुन्हेगारीकडे वळलेल्यांची माहिती संकलित केली जात आहे. तसेच गल्लीतील दादा आणि गावगुंडांवरही आता पोलिसांची बारीक नजर राहणार आहे. शहरांसह ग्रामीण भागात वास्तव्य करणा-या जनतेला अवैध व्यवसायाबाबत माहिती असेल अथवा त्यांना गुंडांकडून त्रास होत असेल तर जनतेने तत्काळ स्थानिक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
वाळूतस्करांवर वॉच कसा ठेवता ?
पाटील : वाळूतस्करीतून जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून वाळूतस्करांवर कडक कारवाई केली जात आहे. एमपीडीए व मोक्का कायद्यातंर्गत कारवाई झालेले सर्वाधिक गुन्हेगार हे वाळूतस्कर आहेत. जिल्ह्यात वाळूतस्करी होते त्या तालुक्यातील ठिकाणांची माहिती पोलिसांकडे आहेत. येणा-या काळात या ठिकाणांवर पोलीस कायम वॉच ठेवणार आहेत. तसेच वाळूतस्करांचीही माहिती ठेवण्यात येणार असल्याचे सागर पाटील यांनी सांगितले.
सायबरचे मनुष्यबळ वाढविणार
डिजिटल तंत्रज्ञानामुळे दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यातील बहुतांशी गुन्ह्यांचा तपास हा किचकट आणि आव्हानात्मक असतो. तपासकामाला गती यावी, यासाठी सायबर पोलीस ठाण्यातील मनुष्यबळ वाढविणे व त्यांना अपेक्षित असलेला सर्व तो टेक्निक बॅकअप उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत
पोलीस तपासात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाची भूमिका निभावत असतात. शहरात विविध गुन्हेगारीच्या घटना घडतात. एखाद्या घटनेतील आरोपींची ओळख पटविणे अवघड जाते. मात्र हे गुन्हेगार कुठे सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले तर त्यांना शोधणे सोपे जाते. यासाठी नगर शहरातील छोटे, मोठे दुकानदार व इतर व्यावसायिकांनी आपल्या दुकानांसमोर, कार्यालयांसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पुन्हा एकदा व्यापारी संघटनेची बैठक घेऊन त्यांना कॅमेरे बसविण्याबाबत सांगण्यात येणार आहेत. हे कॅमेरे संबंधित दुकानदार व व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पाटील म्हणाले.
रस्त्यालुटीला आवर कसा घालणार?
नगर जिल्ह्णातील गेल्या दीड ते दोन वर्षांतील रस्तालुटीच्या घटनांचे अवलोकन केले तर सर्वाधिक घटना या महामार्गावर झालेल्या आहेत. यासाठी शहरातून जाणा-या महामार्गावर सध्या रात्रीचे पेट्रोलिंग सुरु करण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत पोलीस वाहनाच्या फे-या वाढविण्यात येणार आहेत. तसेच नगर शहरातही रात्रीचे पेट्रोलिंग वाढविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.