साईंच्या चर्म पादुका दक्षिण भारताच्या दौऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 21:39 IST2025-04-10T21:38:37+5:302025-04-10T21:39:24+5:30
अधिकारी, सुरक्षारक्षक, मंदिरातील पुजारी असा २० कर्मचाऱ्यांचा सहभाग

साईंच्या चर्म पादुका दक्षिण भारताच्या दौऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी : साईबाबा संस्थांच्यावतीने १० एप्रिलपासून २६ एप्रिलपर्यंत साईबाबांच्या मूळ चर्म पादुकांचा महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतील भाविकांच्या दर्शनासाठी पादुका दर्शन सोहळा आयोजित केला आहे. पहिल्या टप्प्यात दक्षिण भारतातील आठ शहरात साईंच्या चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी नेण्यात येत आहेत. शिर्डीतील साई मंदिरात या पादुकांची विधिवत पूजा करून साई संस्थान अधिकारी व सुरक्षारक्षकांसह या पादुका गुरुवारी रवाना करण्यात आल्या.
यावेळी शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते, प्रताप जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे इतर अधिकारी उपस्थित होते.
साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो भाविक शिर्डीत येतात. मात्र ज्या भाविकांना शिर्डीला येता येत नाही, अशा अनेक भाविकांनी शिर्डी साईबाबा संस्थानला बाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, या राज्यातून भाविकांची यासाठी मोठी मागणी होती. साईबाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार व्हावा तसेच भाविकांना साईंच्या मूळ चर्म पादुकांचे दर्शन मिळावे या हेतूने हा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संस्थानची नियमावली
सव्वाशे वर्षांपूर्वीच्या साईबाबांच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी बाहेर घेऊन जात असल्याने भाविकांना कशा पद्धतीने दर्शन देता येईल यासाठी संस्थानच्या वतीने नियमावली तयार करण्यात आली आहे. जेथे पादुका सोहळा आयोजित करण्यात आला, त्याच ठिकाणी पादुका ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही भाविकाच्या घरी या पादुका नेण्यात येणार नाहीत. तसेच या पादुका सोहळ्यासाठी साई संस्थानच्या अधिकाऱ्यांसह सुरक्षारक्षक तसेच साई मंदिरातील पुजारी असा एकूण २० कर्मचाऱ्यांचा सोहळ्यात सहभाग असेल. शिर्डीत साईबाबांच्या मंदिरात जे नित्य कार्यक्रम होतात तसेच कार्यक्रम पादुका सोहळ्यादरम्यान होणार आहेत.
खंडपीठाच्या निर्णयानंतर अंमलबजावणी
महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू या तीन राज्यातील भाविकांची मागणी पाहता साईबाबांच्या मूळ चर्म पादुका घेऊन जाण्याचा निर्णय साई संस्थाच्या त्रिसदस्यीय कमिटीने घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने साईबाबा संस्थानवर त्रिसदस्यीय कमिटी नेमली आहे. या कमिटीत अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य न्यायाधीश हे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आहेत व जिल्हाधिकारी तसेच साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कमिटीने साईबाबांनी आपल्या हयातीत वापरलेल्या सव्वाशे वर्षांपूर्वीच्या मूळ चर्म पादुका भाविकांना दर्शनासाठी शिर्डी बाहेर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता साई संस्थानकडून करण्यात आली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
असा असेल साई पादुका दौरा सोहळा..
१० ते १३ एप्रिल पर्यंत महाराष्ट्रातील सांगली शहर व जिल्ह्यातील पेठ वडगाव.
१४ ते १८ एप्रिल कर्नाटक राज्यातील दावनगेरे, मल्लेश्वरम येथे सहा दिवस.
१९ एप्रिल रोजी सायंकाळी तामिळनाडूकडे पादुका रवाना होतील.
१९ ते २६ एप्रिल पर्यंत तामिळनाडू राज्यातील सेलम, करूर, पुलीयमपट्टी, धर्मापुरी.
२६ एप्रिल रोजी संध्याकाळी धर्मापुरी येथून साईंच्या पादुका पुन्हा शिर्डीकडे रवाना होतील.