बिबट्याच्या तावडीतून ‘साई’ बचावला
By Admin | Published: May 21, 2014 11:53 PM2014-05-21T23:53:13+5:302014-05-22T00:03:05+5:30
संगमनेर : चिमुकल्यावर हल्ला करून जबड्यात धरून उचलून नेणार्या बिबट्याशी पित्याने संघर्ष करून पोटच्या गोळ्याला वाचविल्याची घटना तालुक्यातील पेमगिरीच्या येळूशी मळ्यात घडली.
संगमनेर : चिमुकल्यावर हल्ला करून जबड्यात धरून उचलून नेणार्या बिबट्याशी पित्याने संघर्ष करून पोटच्या गोळ्याला वाचविल्याची घटना तालुक्यातील पेमगिरीच्या येळूशी मळ्यात घडली. बिबट्याच्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाले असून परिसरात दहशत पसरली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसातची वेळ. येळूशी मळ्यात राहणारे शेतकरी शिवाजी म्हस्के हे दिवसभराच्या उकाड्याने हैराण झाले होते. काहीली शमविण्यासाठी मुलगा साई (वय २) याला सोबत घेऊन ते घराबाहेरील पाण्याच्या टाकीवर अंघोळीस गेले. अंघोळ करताना अंधारात दबा धरून बसलेल्या एका नरभक्षक बिबट्याने टाकीच्या आडून थेट साईवर झेप घेतली. ‘साई’ला जबड्यात उचलून पळण्याच्या तयारीत असल्याचे पाहून शिवाजी म्हस्के यांनी बिबट्याचे मागचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले. मुलास वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणार्या म्हस्के यांना बिबट्याने काही अंतरापर्यंत ओढत नेले. परंतू पूर्ण ताकदीने प्रतिकार करणार्या म्हस्के यांच्या संघर्षाला अखेर यश आले. बिबट्याने ‘साई’ला खाली टाकून धूम ठोकली. बिबट्याने कडाडून चावा घेतल्याने ‘साई’च्या उजव्या गालावर झालेल्या गंभीर जखमांमधून भळभळून रक्त वाहत होते. ‘साई’ला वाचविल्याचा आनंद म्हस्के यांच्या चेहर्यावर होता. पण, तो जखमी असल्याने अंगाचा थरकापही उडत होता. जखमी अवस्थेत ‘साई’ला उपचारार्थ तातडीने शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या प्रकाराने परिसरात दहशत पसरली असून बिबट्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)