शेतक-यानी साई संस्थान बैठकीचे कामकाज बंद पाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 07:53 PM2018-04-04T19:53:06+5:302018-04-04T19:53:14+5:30
साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले.
शिर्डी : साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले.
संबंधित शेतक-याची जमीन खरेदी करण्यासंबंधी या व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय घेण्याची ग्वाही संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. न्यायालयाने यापूर्वीच अनुमती देऊन तसेच गेल्या सात महिन्यांपूर्वी संस्थाननेही या संदर्भातील उपोषणकर्त्यांना आश्वासन देऊनही अशोक गोंदकर यांची जमीन खरेदी केली नाही़ याबाबत संस्थान काहीही ठोस भूमिका घेत नसल्याने मंगळवारीच गोंदकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी अशोक गोंदकर यांनी साईनिर्माण संघटनेचे अध्यक्ष विजय कोते व माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता अनेक कार्यकर्त्यांनी संस्थानच्या सभागृहाच्या दरवाजाचा ताबा घेतला़ दरवाजालाच फलक लावून प्रवेश बंद केला़ तसेच सभागृहासमोर बसून टाळ वाजवून आंदोलन सुरू केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, सचिन चौघुले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जवळपास दोन तास हे आंदोलन सुरू होते. आंदोलक हटत नसल्याचे बघून व्यवस्थापनाने सुरक्षा यंत्रणेचा वापर करून अन्यत्र बैठक घेण्याचा पवित्रा घेतला. यानंतर आंदोलकांच्या भावना अधिक तीव्र होण्याची शक्यता पाहून हावरे यांनी विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे यांना चर्चेसाठी पाठविले. आंदोलकांनी चर्चेस नकार दिल्याने अखेर हावरे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आजच सभागृहात निर्णय घेऊन शासन मान्यतेसाठी पाठवू, त्या मान्यतेनंतर जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करू, अशी ग्वाही दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा योगिता शेळके, विश्वस्त बिपीन कोल्हे, प्रताप भोसले आदींची उपस्थिती होती.