साई संस्थानच्या अध्यक्षांची कार फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 12:48 PM2018-11-02T12:48:29+5:302018-11-02T12:48:48+5:30

साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री निधीला पन्नास कोटी रुपये देण्याच्या निर्णयाचे गुरुवारी शिर्डीत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून शहरात दंडुके मोर्चा काढला़

Sai institute's president car broke | साई संस्थानच्या अध्यक्षांची कार फोडली

साई संस्थानच्या अध्यक्षांची कार फोडली

शिर्डी : साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री निधीला पन्नास कोटी रुपये देण्याच्या निर्णयाचे गुरुवारी शिर्डीत तीव्र पडसाद उमटले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करून शहरात दंडुके मोर्चा काढला़ संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या मर्सिडीज कारच्या आंदोलकांनी काचा फोडल्या.
साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री निधीसाठी पन्नास कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे़ यातील तीस कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर वीस कोटी रुपये मुख्यमंत्री फंडात दुष्काळ निवारणासाठी देण्यात येणार आहेत़ राज्य शासनाच्या मागणीनुसार हा निधी देण्यात येणार असून पंतप्रधान दौऱ्यापूर्वी ६ आॅक्टोबरच्या व्यवस्थापनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जलसंधारणासाठी साई संस्थानने थेट ५० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करीत शासनाला निधी दिल्याचा स्थानिकांनी निषेध केला. काँग्रेसने गुरुवारी संस्थानच्या कार्यालयावर दंडुके मोर्चा काढला. संस्थानची बैठक सुरू असलेल्या इमारतीला पोलिसांनी व सुरक्षा रक्षकांनी वेढा दिला होता. दंडुक्यासह कार्यकर्त्यांना आत सोडण्यास पोलिसांनी नकार दिला़ आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाची झाली़ आंदोलकांनी संरक्षक भिंतीवरून उड्या घेत अध्यक्ष हावरे यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि त्यांच्या कारच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते, उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, प्रमोद गोंदकर, नितीन शेळके, सचिन चौघुले यांच्यासह पंधरा ते वीस आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त समर्थकांनी रास्ता रोको केला.


शिर्डीतील असंतुष्ट व लोकशाही मान्य नसलेल्या काँग्रेसच्या एका गटाने हा प्राणघातक हल्ला केला आहे़ जीवितहानी करण्याचा, दंगल करण्याचा यामागे हेतू होता़ कमी दराने जमिनी घेऊन संस्थानला विकण्याचा त्यांचा धंदा आहे़ आपण ते थांबवल्याने वैफल्यातून आंदोलने सुरू आहेत़ दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निधीसाठी पन्नास कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे़ या भ्याड हल्ल्याला आम्ही घाबरत नाहीत. गाडी फोडणाºयांवर कठोर कारवाई करावी.
-डॉ़सुरेश हावरे, साईसंस्थान अध्यक्ष


जमीन खरेदी-विक्रीचा आरोप करून अपयश झाकण्यासाठी हावरे यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे़ संस्थानचा निधी बाहेर तसेच पक्षवाढीसाठी वापरला जात आहे़ शिर्डीवर मात्र अन्याय होत आहे़ विकासकामे रखडल्याने ग्रामस्थ व भक्तांमध्ये संताप आहे़ तुरुंगात टाकले तर तेथे आमरण उपोषण करू. - कैलास कोते, माजी नगराध्यक्ष-आंदोलक

Web Title: Sai institute's president car broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.