साई संस्थानची दानपेटी करमुक्त, १७५ कोटींची सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:22 AM2022-11-26T11:22:42+5:302022-11-26T11:28:11+5:30
यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली.
शिर्डी : साई संस्थानला दानपेटीद्वारे मिळणारी देणगी हे उत्पन्न असल्याचे गृहीत धरून आयकर विभागाने यावर ३० टक्क्यांप्रमाणaे आयकर आकारणी केली होती. मात्र, यावरील अपिलानंतर आता आयकर विभागानेच ही देणगी करमुक्त असल्याचे जाहीर केल्याने संस्थानला पावणेदोनशे कोटीची करसवलत मिळाली आहे.
यापुढे साईबाबांच्या दानपेटीत येणारी सर्व रक्कम करमुक्त असणार आहे. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनीच ही माहिती दिली. आयकर विभागाने सन २०१५-१६ चे करनिर्धारण करताना साईबाबा संस्थान हा धार्मिक ट्रस्ट नसून धर्मादाय ट्रस्ट असल्याचे गृहीत धरले होते. यासोबतच मागील दोन वर्षांचाही कर आकारणीचा निर्णय घेतला होता. डिसेंबर २०१९ मध्ये साई संस्थानला १८३ कोटी रुपये कर भरणा नोटीस दिली होती. त्यावर संस्थानचे तत्कालीन सीईओ कान्हुराज बगाटे यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालय व नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.