साईसंस्थानचे आपल्या कोरोना योद्धयांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:21 AM2021-04-27T04:21:39+5:302021-04-27T04:21:39+5:30
साईसंस्थानने महसूल व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेले कोविड रुग्णालय सध्या तालुक्यातील हजारो रुग्णांसाठी मोठा आधार ठरत ...
साईसंस्थानने महसूल व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेले कोविड रुग्णालय सध्या तालुक्यातील हजारो रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. संस्थानच्या रुग्णसेवेतील संपूर्ण यंत्रणा सध्या कोविड सेवेत व्यस्त असून सर्व इमारती, हॉस्पिटल रुग्णांनी हाऊसफुल्ल आहे.
गेल्यावर्षी कोविड सेवेतील कर्मचारी पॉझिटिव्ह आला तर त्याला शासन नियमाप्रमाणे चौदा दिवस विशेष कोविड-१९ पगारी सुट्टी देण्यात येत होती. गेल्या महिन्यापासून प्रशासनाने संबंधित विभागांना तोंडी सूचना देऊन या सुट्टया बंद केल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या सुट्टयांतून या सुट्टया खर्ची टाकण्यात येत आहेत. कोविड सेवेतील कर्मचाऱ्यांचा पन्नास लाखांचा विमा उतरवण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मात्र, आता विम्याचीही चर्चा होत नाही किंवा त्याबाबत काय झाले कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही. विशेष म्हणजे संस्थानने स्वच्छता, सुरक्षा, विद्युत आदी विभागांसह विविध कारणाने रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणसुद्धा करवून घेतलेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. विशेष म्हणजे संस्थानातील कर्मचारी संघटनांनी याबाबत मौन बाळगल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
संस्थानातील जवळपास सातशे कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन आपल्या विविध मागण्यांकडे नुकतेच लक्ष वेधले आहे. यात साईसंस्थानमधील सर्व कायम कर्मचारी, कायम कंत्राटी कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांना व त्यावर अवलंबून असलेल्या घरातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास उपचारासाठी एक स्वतंत्र इमारत राखीव असावी, कोरोनावरील औषधाचा मुबलक साठा असावा, सर्व कर्मचारी यांना कोरोनाची मोफत लस मिळावी, पेशंटचा आरटीपीसीआरचा रिपोर्ट येईपर्यंत पेशंट अॅडमिट करावे, सर्व उपचार हे मोफत मिळावे आदी मागण्यांचा समावेश आहे.