साईदरबार उद्यापासून खुला होणार; भाविकांना 'या' नियमांचं पालन करावं लागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 01:35 PM2020-11-15T13:35:17+5:302020-11-15T13:41:00+5:30
सुरूवातीला सहा हजार भाविकांना दर्शन, ऑनलाईन बुकींग सक्तीचे
शिर्डी: राज्य सरकारने येत्या पाडव्यापासून प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. मंदिरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.
पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
कोरोनामुळे गेल्या १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सुरवातीला सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल.
६५ वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे.
भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मात्र चावडी आणि मारूती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिकेडिंगमधून पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पूजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळूहळू भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.