साईबाबा संस्थान तुप खरेदीतील लाच प्रकरणी चौकशी सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:14 PM2018-07-19T16:14:10+5:302018-07-19T16:16:34+5:30
साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी या तपास पथकाची नियुक्ती केली आहे.
शिर्डी : साईबाबा संस्थानातील तुप खरेदी प्रकरणातील कथीत लाच प्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकारी, वित्त व लेखा अधिकारी, अहमदनगर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन व शिर्डी प्रांताधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार विभागीय आयुक्तांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी या तपास पथकाची नियुक्ती केली आहे.
साईबाबा संस्थानात गेल्या वर्षी आठ डिसेंबर रोजीच्या बैठकीत तुप खरेदी प्रकरणी स्मृती डेअरीचे संचालक अमन गोयल यांनी साईबाबा संस्थानच्या वरिष्ट अधिकारी व विश्वस्तांनी लाच घेतल्याचा आरोप केला होता. ही चर्चा सार्वजनिक झाल्याने खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले होते.
या प्रकरणी संस्थानची बदनामी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर सामाजिक कार्यकर्ते संदिप कुलकर्णी यांनी अध्यक्ष सुरेश हावरे व मुख्यमंत्री यांचेकडे या प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली होती. याच वेळी सामाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनीही या तुप लाच प्रकरणी विधि व न्याय विभागाकडे स्वतंत्र तक्रार केली होती. तसेच शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. कुलकर्णी यांनी संस्थान अध्यक्ष हावरे यांच्याकडे केलेली तक्रारही हावरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती.
या सर्व वेगवेगळ्या तक्रारीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या विभागीय आयुक्तांना स्वतंत्र तपासणी पथक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते़ काल, १८ जुलै पासुन समितीची सुनावणी सुरू झाली. काल केवळ संदीप कुलकर्णी या समिती समोर उपस्थीत झाले. इतर तक्रारदार बाहेरगावी असल्याने तसेच कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्याने अनुपस्थीती होते. पुढील सुनावणी एक आँगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे. या दिवशी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे व स्मृती डेअरीचे संचालक अमन गोयल, रावसाहेब खेवरे यांनाही माहिती घेण्यासाठी हजर राहाण्यासाठी कळवण्यात आल्याचे प्रांताधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.