साईभक्ताला दोन लाखांना लुटले
By Admin | Published: August 10, 2014 11:24 PM2014-08-10T23:24:58+5:302014-08-10T23:29:17+5:30
साईभक्ताला दोन लाखांना लुटले
कोपरगाव : मुंबई येथून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीकडे जाणाऱ्या साईभक्तांना कोपरगाव तालुक्यातील झगडे फाट्याजवळ लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली़ अज्ञात चोरट्यांनी लाकडी दांडक्यांचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी देत पती-पत्नीच्या अंगावरील जवळपास बारा तोळे सोने व ३७ हजार रूपये रोख असा ऐवज पळविला़
सांगपाडा मुंबई येथील जोगेश्वर भेरू मंडल हे आपल्या पत्नीसह कारने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते़
शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्यांची कार कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा येथे आली़ त्यावेळी घारी शिवारात अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावर लोखंडी बॅरीकेट आडवे लावले़ त्यामुळे मंडल यांनी गाडी थांबविली़
चार अज्ञात चोरटे तेथे आले़ त्यांनी लाकडी दांडक्याचा धाक दाखवत मंडल यांच्याकडील दोन तोळे सोन्याची चैन, दोन तोळ्याचे ब्रासलेट, अंगठ्या, मंजू मंडल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चैन, कानातील झुमके तसेच रोख ३७ हजार रूपये असा एकूण १ लाख ९३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी काढून घेतला व पोबारा केला़ अशी फिर्याद मंडल यांनी कोपरगाव पोलिसांत दिली़ अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पवार करीत आहेत़
(प्रतिनिधी)