साईदरबारी प्लास्टिकला नो-एन्ट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:10 PM2019-06-23T15:10:29+5:302019-06-23T15:11:58+5:30
शंभर वर्षांपूर्वी आपल्या कृतीतून पर्यावरणाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात संस्थानने प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़
शिर्डी : शंभर वर्षांपूर्वी आपल्या कृतीतून पर्यावरणाची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात संस्थानने प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे भाविकांना मंदिरात येताना प्रसाद व पूजा साहित्याकरिता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करता येणार नाही़
दर्शन रांगेतून किंवा अन्य ठिकाणांवरून साईभक्तांकडून प्लास्टिक पिशव्या मंदिर परिसरात जाणार नाही यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिल्या आहेत़ गुरूवारी रात्री राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी शेजारतीला हजेरी लावली़ आरतीनंतर एक भाविक द्वारकामाई मंदिरासमोर बिस्कीट पुडे वाटत असल्याचे व या पुड्यांना प्लास्टिकचे आवरण असल्याने कदम यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी या भाविकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले़ भाविकाने दंड भरण्यास नकार दिला़ अखेर भाविकाच्या वतीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: पाचशे रूपये दंडाची पावती फाडली़ भाविकाने ज्या दुकानातून हे पुडे आणले तेथेही या भाविकाला सहकुटुंब नेण्यात आले़ बिस्कीटच्या पुड्याचे कंपनी पॅकिंग आहे ते मी केलेले नाही असे दुकानदाराने सांगितले़
त्यानंतर संस्थानने तातडीने बैठक घेऊन कारवाईचे नियोजन केले.
या पार्श्वभूमीवर शनिवारी साईबाबा संस्थानच्या सभागृहात प्लास्टिकवरील कारवाई कडक करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़
यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ़आकाश किसवे, सुर्यभान गमे, अशोक औटी, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी मधुकर गंगावणे, उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर व नगरपालिकेचे मुख्य लिपिक एम़बी़ देसले आदी उपस्थित होते. मुगळीकर यांनी संबंधितांना प्लास्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी यावेळी स्पष्ट निर्देश दिले़
तीन लाखांचा दंड वसूल
बंदीची कार्यवाही नगरपंचायतीने शहरात तर संस्थानने मंदिर परिसरात यापूर्वीच सुरू केलेली आहे. नगरपंचायतीने जवळपास पावणे तीन टन प्लास्टिक जप्त केले असून सव्वा तीन लाखांचा दंडही वसूल केला आहे़