नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:15 AM2021-01-01T04:15:25+5:302021-01-01T04:15:25+5:30
नाताळ सुट्टी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ केली आहे. गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आगावू आरक्षण ...
नाताळ सुट्टी व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर संस्थानने दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या संख्येत वाढ केली आहे. गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आगावू आरक्षण करून भाविकांनी दर्शनासाठी यावे, असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे वारंवार करत आहेत.
गर्दी व्यवस्थापनासाठी ३१ डिसेंबर रोजी मंदिर रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र मध्यरात्री बारा पुर्वी गर्दी टाळण्यासाठी अर्धातास दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. चार नंबर गेट समोर मंदिरात जावू न शकणाऱ्या भाविकांसाठी कलश दर्शनची अनोेखी व्यवस्था करण्यात आली आहे. मोठ्या स्क्रीनवर येथूनच समाधी दर्शन होत आहे. रांगेतील प्रत्येक भाविकाला मास्कची सक्ती करण्यात आली आहे. दहा वर्षाखालील व पासष्ट वर्षाखालील व्यक्तींना दर्शनबंदी करण्यात आली आहे. सीईओ बगाटे यांच्यासह डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, डॉ. आकाश किसवे यांच्यासह प्रत्येक अधिकारी परि॰म घेत आहेत.
कर्नाटकचे नगरविकास मंत्री बी़ एस़ बसवराज यांच्या देणगीतून समाधी मंदीर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शनिशिंगणापूर येथील शनेश्वर डेकोरेटर्सच्या वतीने परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पोलीस उपअधिक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे, सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे, दिपक गंधाले यांनी मंदिर सुरक्षा पोलीस व संस्थान सुरक्षा सतर्क केली आहे. शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवले आहे.
...........
आपोआप धुतले जाणार पाय
दर्शन रांगेत आपोआप गरम पाण्याने पाय धुतले जातील अशी रचना करण्यात आली आहे. याशिवाय थर्मल चेकींग करून सॅनिटायझरचा वापर करण्यात येत आहे.
( फोटो : ३१ शिर्डी साईमंदिर लाईटिंग व ३१ शिर्डी साईमंदिर डेकोरेशन )