उन्हाळी सुटीच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:40 AM2019-05-27T04:40:37+5:302019-05-27T04:40:54+5:30
उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली आहे़
शिर्डी : उन्हाळी सुट्ट्यांच्या अखेरच्या टप्प्यात साईनगरी भाविकांनी फुलली आहे़ भाजून काढणाऱ्या उन्हाची तमा न बाळगता भाविक साईदर्शनाचा आनंद लुटत आहेत़
यंदा लोकसभा निवडणूक, तीव्र उन्हाळा व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुट्या लागूनही शिर्डीत अपेक्षित गर्दी नव्हती़ मात्र निवडणुकांचा निकाल लागताच भाविकांचा ओघ शिर्डीकडे वळला आहे. सुटीचा शेवटचा टप्पा असल्याने गर्दी वाढली आहे. मंदिर परिसर व रस्ते भाविकांनी गजबजून गेले आहेत़
भाविकांना मोफत दर्शन पासेस काढण्यासाठी ऐन उन्हात पायपीट करावी लागत आहे़ या पासेसनुसार दर्शनाचे कोणतेही शेड्युलिंग होत नसताना केवळ शीरगणतीसाठीच त्याचा उपयोग होत असल्याचे दिसते आहे. वृद्ध व अपंगांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे़ दर्शन रांगेचे काम पूर्ण झाल्यावर या पासेसचा उपयोग होऊ शकतो. मात्र तोवर हे पास म्हणजे भाविकांची शुद्ध छळवणूक असल्याचे चित्र आहे़ झटपट दर्शनासाठी पैसे मोजणाºया भाविकांनाही गर्दीमुळे अनेक तास रांगेत ताटकळत उभे रहावे लागले़ गर्दीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवरही अवैध प्रवासी वाहतूक करणारे सर्रास दिसत होते़
>कोकणात पर्यटकांची गर्दी
रत्नागिरी : गणपतीपुळे, पावससह धार्मिक स्थळे तसेच पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत. आरे-वारे मार्गावर पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. गणपतीपुळे, आरेवारे, काजिरभाटी, मांडवी, भाट्ये बीच, गुहागर, राजापूर, मार्लेश्वर, रत्नागिरी, दापोली, याठिकाणी राज्यासह परराज्यातील पर्यटकांनी गर्दी केली आहे.
>‘अंबाबाई’च्या दर्शनासाठी रांग
कोल्हापूर : शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्या व त्यात उन्हाळी सुटीमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी रविवारी दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. विशेषत: पहाटेपासून दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.