तपोवन रस्त्यावर साकारतेय नगरची नवीन बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:08+5:302021-05-28T04:16:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : एकेकाळी तपोवन रस्त्याची नगरचा बायपास, अशी ओळख होती. रस्ता नीटनेटका नव्हता. साधाच खडीचा, ...

Sakarteya Nagar's new market on Tapovan Road | तपोवन रस्त्यावर साकारतेय नगरची नवीन बाजारपेठ

तपोवन रस्त्यावर साकारतेय नगरची नवीन बाजारपेठ

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : एकेकाळी तपोवन रस्त्याची नगरचा बायपास, अशी ओळख होती. रस्ता नीटनेटका नव्हता. साधाच खडीचा, दगडगोटे, मध्यभागी खासगी प्लॉट, असा नागमोडी हा रस्ता. मात्र खड्डेमय रस्त्यावर डांबराचा मुलामा आला आणि या भागाचे रूपडेच पालटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने, हॉटेल, हॉस्पिटल, किराणा, भाजीपाला, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे छोटी- छोटी दुकाने उभी राहत गेली. पाईपलाईन रोडप्रमाणेच या रस्त्यावरही आता नवीन बाजारपेठ साकारत आहे.

औरंगाबाद व मनमाड हे दोन महामार्ग सावेडी उपनगरातून पुढे मार्गक्रमण करतात. हे दोन्ही महामार्ग एकमेकांपासून लांब अंतरावर असले तरी तपोवन रस्त्यामुळे ते आगदी जवळ आले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित होता. लोकवस्ती वाढत होती. परंतु, रस्ता मरणासन्न अवस्थेत होता. परिणामी विकास थांबला होता. खासगी प्लॉट रस्त्यातील प्रमुख अडथळा होता. हा अडथळा दूर करण्यात येथील राजकारण्यांना यश आले. रस्त्याच्या कामातही राजकारण झालेच. उशिरा का होईना, पण रस्ता झाला. त्यामुळे वर्दळ वाढली. रस्त्यांच्या बाजूला बांधकाम व्यावसायिकांनी गुंतवणूक केली. त्याला प्रतिसादही मिळाला. भाव वाढले. एकामागोमाग एक दुकाने सुरू झाली. पूर्वी या भागात काहीच मिळत नव्हते. भाजीपाला, किराणा आदी वस्तूंसाठी पाईपलाईन रोडला जावे लागत असे. परंतु, गेल्या दोन वर्षात तपोवन रस्त्यावर सगळे काही मिळू लागले आहे. भाजीपाल्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंतची सर्व दुकाने उभी राहिली. अगदी शहरातील दुकानदारांनीही या भागात आपल्या शाखा सुरू केल्या. शाळा व महाविद्यालये आली. हॉस्पिटल आले. टोलेजंग हॉटेल उभे राहिले. अंतर्गत रस्ते, वीज, पाणी, या सुविधाही महापालिकेने पुरविल्या. तसेच रस्त्याच्या पलीकडील बाजूस बुर्हानगरगावाची हद्द सुरू होते. या ही ग्रामपंचायतदेखील महापालिकेप्रमाणे सुविधा निर्माण पुरवित आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने विकास होत असून, या भागात नवीन गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्याला प्रतिसादही चांगला मिळत आहे. येथून नागापूर आणि नेवासा औद्योगिक वसाहत जवळ असल्याने कामगार या भागाला पसंती देताना दिसतात. यामुळे या भागातील लोकवसाहत वाढून विकास झपाट्याने होऊ लागला आहे.

....

दोन वर्षात कायापालट

तपोवन रस्ता परिसरात दोन वर्षांपूर्वी काहीही नव्हते. रस्ता कच्चा होता. त्यामुळे लोकवस्ती असून, ही भाग विकसित झाला नाही. परंतु, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील लोकवस्ती वाढवून बाजारपेठही वाढली. हे गेल्या दोन वर्षांतच झाले. पूर्वी काही नव्हते, असे या भागातील नागरिकांचे म्हणने आहे.

.....

दहा वर्षांपूर्वी या भागात राहायला आले. त्यावेळी काहीही नव्हते. रस्ता छोटा होता. लोकवस्तीही विरळ होती. काहीही घ्यायचे झाल्यास गावात किंवा पाईपलाईन रोडला जावे लागत होते. परंतु, अलीकडे सर्वकाही इथेच मिळत आहे. त्यामुळे गावात जाणयाची गरज राहिली नाही. भविष्यात हा भाग चांगला विकसित होईल.

- अश्विन गडाख, रहिवासी तपोवन रोड परिसर

......

या भागात तपोवन देवस्थान आहे. त्यामुळे या रस्त्याला तपोवन नाव पडले. औरंगाबाद ते मनमाड महामार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. रस्त्यात एक खासगी प्लॉट आहे. त्यामुळे रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते. हे काम पूर्ण व्हावे, यासाठी लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्थेने रस्त्यासाठी स्वत:ची जागा दिली. रस्त्याचे काम सुरू झाले. डांबरीकरण झाल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकाने उभी राहिली असून, या भागाचा विकास होऊ लागला आहे.

- नीलेश पठारे, रहिवासी, लक्ष्मीनगर गृहनिर्माण संस्था

Web Title: Sakarteya Nagar's new market on Tapovan Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.